हजारो भाविकांची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:18 AM2017-08-08T00:18:14+5:302017-08-08T00:21:52+5:30
हर हर महादेव अन् बम बम भोलेचा जयघोष करीत हजारो भाविकांनी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारत अन् भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनाचा लाभ घेत श्रावण महिन्याचे पुण्य पदरी पाडले. प्रदक्षिणा मार्गावरील वेगवेगळ्या तीर्थांचे दर्शन करीत सृष्टीसौंदर्याने नटलेल्या निसर्गाचा आनंद घेतला.
त्र्यंबकेश्वर : हर हर महादेव अन् बम बम भोलेचा जयघोष करीत हजारो भाविकांनी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारत अन् भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनाचा लाभ घेत श्रावण महिन्याचे पुण्य पदरी पाडले. प्रदक्षिणा मार्गावरील वेगवेगळ्या तीर्थांचे दर्शन करीत सृष्टीसौंदर्याने नटलेल्या निसर्गाचा आनंद घेतला.
प्रदक्षिणार्थींनी संपूर्ण ब्रह्मगिरीला त्र्यंबकेश्वर मंदिरापासून सुरुवात केली. रात्री ८ वाजेपासूनच प्रदक्षिणेस प्रारंभ करण्यात आला. श्रावणातला तिसरा सोमवार म्हणजे एकप्रकारे भाविकांचा पर्वणीचा दिवस. अशी श्रद्धा आहे की, या सोमवारी परिक्र मा केली की पूर्ण श्रावण महिन्याचे पुण्य लाभते. प्रदक्षिणा मार्गावर विविध असे छोटी छोटी तीर्थे असून, त्या तीर्थांचा विकास होऊन किमान दर्शनीय स्थळे करावीत, अशी भाविक प्रदक्षिणार्थींची अपेक्षा आहे. या तीर्थांमध्ये प्रयागतीर्थ, वेणीमाधव, सरस्वतीतीर्थ, रामतीर्थ, बाणगंगा, निर्मलतीर्थ, धवलगंगा, पद्मतीर्थ, भुजंगतीर्थ, गणेशतीर्थ (गणपती बारी), बिल्वतीर्थ, महादेवी गंगागौरी, शनिमारुती, अहल्या-गोदावरी संगम, संगमेश्वर महादेव (जुना महादेव), शितलादेवी व भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन गायत्री त्रिसंध्येश्वर, गौतमेश्वर, ऋणमुक्तेश्वर (त्रिभुवनेश्वर), भद्रकाली व कुशावर्त तीर्थावर प्रदक्षिणेचा समारोप होतो. पोलिसांचा कडक बंदोबस्तशहरात पोलीस यंत्रणांनी चोख बंदोबस्त ठेवला. जव्हार फाटा, महादेवी नाका, बाजार समितीजवळील जुना जव्हार फाटा, डॉ. आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौक, कुशावर्त तीर्थ, तेली गल्ली आदी ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनांना बंदी करण्यात आली होती तसेच वरील प्रत्येक पॉइंटवर कडक बंदोबस्त ठेवत प्रदक्षिणा मार्गावर पोलीस फोर्स तैनात करण्यात आली होती. सोमवारी येणाºया प्रदक्षिणार्थींसाठी प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी मोफत चहा, फराळाची सोय सेवाभावी संस्थांनी करून दिली होती. वनविभागाने प्रदक्षिणा मार्गावर आपलेही कर्मचारी नेमत प्रदूषण होऊ न देण्याचा प्रयत्न केला. यासाठी स्वत: उपवन संरक्षक कैलास अहिरे आदी तळ ठोकून होते. वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत विभागाने कर्मचारी नियुक्त केले होते. सहायक उपअभियंता किशोर सरनाईक दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरलाच आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने गावातील साफसफाई, पथदीप, जीवरक्षक, अग्निशामक बंब यावर खास नजर ठेवली होती. रविवारी रात्रीपासूनच परिक्रमेला सुरु वात झाली होती. यंदा गर्दीत घट ! तिसºया सोमवारच्या गर्दीतही दरवर्षागणिक घट होत आहे. यावर्षी गर्दीवर परिणाम होऊन अजूनच गर्दी कमी झाली. सिंहस्थातील पहिल्या पर्वणीचे नियोजन असेच फसले होते. बंदोबस्ताचा अतिरेक झाल्याने अनेक भाविकांना परत फिरावे लागले होते. हा अनुभव घेऊनच दुसºया आणि तिसºया पर्वणीला पोलीस बंदोबस्तात थोडी शिथिलता आणल्यामुळेच सिंहस्थातील गर्दी नंतर वाढली होती. यावेळेसदेखील तसेच झाले. नेहमी रविवारी दिवसा येणाºया भाविकांनी यावर्षी रविवारी रात्रीच गर्दी केली होती. जणांवर उपचार : त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थ आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. प्रदक्षिणेला आलेल्या परंतु अचानक थंडी, ताप, कंबरदुखी, डोकेदुखी उद्भवल्याने आजारी पडलेल्यांनी तसेच परिक्रमा मार्गावर पडल्यामुळे जखमी झालेल्या काहींनी त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले, तर काहींना अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले. असे जवळपास ४० च्या दरम्यान रु ग्ण होते. किरकोळ जखमी व थंडीताप, डोकेदुखी उद्भवलेल्या रु ग्णांना गोळ्या-औषधे देऊन घरी पाठविण्यात आले. यावेळी सर्व व्यवस्थेवर त्र्यंबकेश्वर वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय दुसाने, डॉ. भागवत लोंढे, डॉ. कल्याणी वासनिक, डॉ. प्रशांत नायडू आदिंनी उपलब्ध करून दिली. पोलीस अधीक्षकांकडून आढावा : त्र्यंबकेश्वर पोलिसांनी खिसेकापू पकडले, मुद्देमाल मिळाला, पण फिर्यादी मिळाले नाहीत. फिर्यादी आल्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. संजय दराडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन कायदा आणि सुव्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला. पोलिसांनी उत्तम बंदोबस्त ठेवला होता. त्र्यंबक नगरपालिकेने उत्तम सेवा बजावली. शहर स्वच्छता उत्तमरीत्या केली, तर परिवहन महामंडळाने गाड्यांची कमतरता पडू दिली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही. दरम्यान, यावेळच्या तिसºया श्रावणी सोमवारी भाविकांच्या संख्येत घट झाल्याचे जाणवले.