हजारो भाविक दाखल : दर्शनासाठी मंदिरात तोबा गर्दी बाळ येशू यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:59 AM2018-02-11T00:59:28+5:302018-02-11T00:59:54+5:30
उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशू मंदिराच्या दीड दिवसाच्या यात्रोत्सवास शनिवारी (दि.१०) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर येथील बाळ येशू मंदिराच्या दीड दिवसाच्या यात्रोत्सवास शनिवारी (दि.१०) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. बाळ येशूच्या दर्शनासाठी व नवसपूर्तीसाठी राज्याच्या विविध भागातून व परराज्यातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. बाळ येशू मंदिराची दीड दिवसाची यात्रा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसºया शनिवारी भरते. शनिवारी पहाटे सहा वाजेपासून सेंट झेवियर शाळेच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात ख्रिस्ती धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर मिस्साबली सामूहिक प्रार्थनेमध्ये राज्याच्या व देशाच्या विविध भागातून आलेले भाविक सहभागी झाले होते. सकाळी सहा वाजेपासून मराठी, इंग्रजी व तमीळ भाषेतून प्रारंभ झालेल्या सामूहिक प्रार्थनांमध्ये नाशिक धर्मप्रांताचे मुख्य धर्मगुरू बिशप लुड्स डॅनियल, फादर ट्रेव्हर मिरांडा, फादर विन्सी डिमॅलो, फादर जो डायस, फादर जॉन सायरिक, फादर लिनस डिमॅलोे, फादर लेरॉय रॉड्रिग्ज, फादर सतीश कदम, फादर जोएल नॉरेन्हा, फादर फ्रान्सिस फर्नांडिस, फादर ख्रिस्तोफर जयकुमार, फादर ओब्रे फर्नांडिस, फादर स्टेफन घोषाल, फादर केनिथ डिसूझा आदी धर्मगुरूंनी भाविकांना मार्गदर्शन केले. बाळ येशू मंदिरात भाविकांनी दर्शन व नवसपूर्तीसाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी नवसपूर्तीसाठी भाविकांनी मेणाचे पुतळे अर्पण केले. सकाळी ६ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत दर तासाला सामूहिक प्रार्थना होत होती. रस्त्याच्या दुतर्फा पूजेचे साहित्य, मिठाई, खेळणी, विविध वस्तू विक्रीची व खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली आहेत.