सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, आजची माळ सहावी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 01:57 PM2017-09-26T13:57:40+5:302017-09-26T15:16:25+5:30
आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तश्रृंगगडावर सुरू असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवात सहाव्या माळेला मंगळवारचे औचित्य साधत राज्यभरातील भाविकांनी देवीच्या दर्शनाला गर्दी केली आहे.
सप्तश्रृंगगड (नाशिक) - आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तश्रृंगगडावर सुरू असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवीच्या नवरात्रोत्सवात सहाव्या माळेला मंगळवारचे औचित्य साधत राज्यभरातील भाविकांनी देवीच्या दर्शनाला गर्दी केली आहे. मंगळवारी सकाळी 7.30 वाजता सप्तश्रृंगी देवीला सुवर्ण अलंकार अर्पण करण्यात आले. पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी 8 वाजता देवीची महापूजा करण्यात आली. दुपारी 12 वाजता देवीची पंचामृत महापूजा करण्यात येऊन हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवीची महाआरती करण्यात आली.
पहिल्या माळेपासूनच भाविकांचा सुरू झालेला ओघ आजच्या सहाव्या माळेलादेखील वाढता दिसून आला. देवीभक्तांमधील उत्साहामुळे गडावर चैतन्याचे वातावरण पसरले आहे. दैनंदिन अलंकार पूजा, मिरवणूक व पूजन आदी विधीदेखील चैतन्यपूर्ण वातावरणात व भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घातल्याने केवळ एसटी बसने नांदुरी ते गड असा प्रवास करावा लागत आहे. यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. अनेक भाविक राज्याच्या कान्याकोप-यातून पायी चालत येत सप्तशृंगी देवीच्या चरणी लीन होत आहेत.
गडावर येणा-या भाविकांमध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. नांदुरी ते गड या घाट रस्त्यावर निर्माण झालेले धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असल्याने या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह भक्तगणांना होत असल्याचे पाहता घाट व वळणरस्त्यावर उतरून कुठेही सेल्फी न घेण्याचे, तसेच भाविकांनी स्वत:बरोबर इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांनी केले आहे. कडक ऊन, रात्रीचा गारवा अशा वातावरणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.
फ्यूनिक्युलर ट्रॉली सुरू करण्याची मागणी
सप्तश्रृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सव सुरू असून, ज्येष्ठ नागरिक व महिलांसह भाविकांना या काळात गडाच्या पाय-या चढून जावे लागू नये, म्हणून तत्काळ गडावर सुस्थितीत असलेली फ्यूनिक्युलर ट्रॉली (रोप-वे) सुरू करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गडावर फ्यूनिक्युलर ट्रॉली अद्याप सुरू झालेली नाही. वयोवृद्ध व अपंग भक्तांना यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी मंदिरापर्यंत जाता यावे यासाठी फ्यूनिक्युलर ट्रॉलीची चाचणी घेऊन ती तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री. महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी निवासिनी देवीचे आजचे रुप