तुमच्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:17 AM2021-08-23T04:17:24+5:302021-08-23T04:17:24+5:30
ई-चलन पद्धतीद्वारे दंडात्मक कारवाई शहर वाहतूक शाखेकडून केली जाते. यावेळी वाहनांच्या क्रमांकाचे छायाचित्र काढून घेत त्याद्वारे आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी ...
ई-चलन पद्धतीद्वारे दंडात्मक कारवाई शहर वाहतूक शाखेकडून केली जाते. यावेळी वाहनांच्या क्रमांकाचे छायाचित्र काढून घेत त्याद्वारे आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या वाहनमालकाच्या नावे तसेच त्या नोंदणीकृत क्रमांकाच्या वाहनाच्या उल्लेखासह दंडाची पावती फाडली जाते. ही पावती थेट संबंधित वाहनचालकाला पाठविली जाते. या पावतीवरील रक्कम वेळेत अदा करणे अपेक्षित असताना वाहनचालक दंड भरण्याबाबत कानाडोळा करतात अन् त्यानंतरही सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याची मुजोरी दाखवितात. यामुळे पुन्हा पुन्हा पोलिसांच्या ‘डोळ्यांत येऊन’ ई-चलन पावतीचे धनी होतात. यामुळे बहुतांश वाहनचालकांवर एकापेक्षा अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची नोंदही आढळते.
---इन्फो---
...असे फाडले जाते ई-चलन
१) ई-चलन फाडण्यासाठी वाहनांच्या क्रमांकाचा फोटो घेतला जातो. यानंतर त्यावरील आरटीओ नोंदणी क्रमांक वाहतूक पोलिसांकडून त्यांच्या ई-चलन यंत्रात नोंदविले जाऊन त्याद्वारे सदर वाहनावर यापूर्वी काही दंड थकला आहे का याची तपासणी केली जाते आणि वाहन मालकाने नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर दंडाची रक्कम आणि कोणत्या कारणास्तव दंड करण्यात आला ते कारणाच्या उल्लेखासह ऑनलाइन पावती पाठविली जाते.
२) ई-चलन यंत्र थेट आरटीओ कार्यालयाशी जोडलेले असते. कोणत्या प्रकारचे वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे, ते वाहतूक नियम निवड करत वाहतूक पोलीस त्यानुसार दंडाची रक्कम टाकतात. मोबाईल क्रमांकावर मेसेज प्राप्त होतो. अनेकदा वाहनचालक आणि मालक वेगवेगळे असतात. अशावेळी जो वाहनचालक असतो त्याचा मोबाइल क्रमांक नमूद केला जातो.
----इन्फो----
पाच वर्षांपासून थकविला दंड
काही महाभागांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर चक्क पाच वर्षांपर्यंत दंडाची रक्कम थकविल्याचेही पोलिसांच्या कार्यवाहीत दिसून आले आहे. बहुतांश वाहनचालकांकडे तर २०१७ सालापासूनचा दंड थकलेला आढळला. यामध्ये काही वाहनचालक हे परजिल्ह्यातील आणि परराज्यातील असल्यामुळे थकबाकीचा आकडा वाढत असून वसुलीसाठी तांत्रिक अडचणी निर्माण होतात. जे स्थानिक वाहनचालक आहेत, त्यांच्या घरी जाऊन वाहतूक पोलिसांकडून दंडाच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.
---इन्फो---
ई-चलनद्वारे झालेला दंड
२०१९- ४,८७,९०४०० (वसूल झालेला दंड)
२०१९- १,८८,६९५ (एकूण केसेस)
---
२०२०- १,१२,९२,०५० (वसूल दंड)
२०२०- ५,७०,९०,८०० (थकबाकी)
---
२०२१- (मे पर्यंत) ८२०९४०० (वसूल दंड)
२०२१- ३,४७,५५,९०० (थकबाकी)