विहिर, कुपनलिकेसाठी शेतकरी खेळताहेत हजारोंचा जुगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 05:13 PM2019-05-13T17:13:19+5:302019-05-13T17:14:21+5:30
सिन्नर : तालुक्यातील शहा परिसरातील वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विहिर व जलस्त्रोत आटल्याने एप्रिल महिन्यापासूनच ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पाणी लागेल की नाही याची शाश्वती नसतांना शेतकऱ्यांकडून हजारो रुपयांचा जुगार खेळला जात आहे.
अगोदरच दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पाण्याशिवाय पर्याय नसल्याने पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी विहिर व कूपनलिकेचा प्रयोग शेतकरी करीत आहेत. मात्र, पाण्याची पातळी खोलवर गेल्याने पाणी मिळवण्यासाठी जमिनीची चाळणी सुरू आहे. पाण्यासाठी विहिर व कूपनलिकेसाठी शेतकरी हजारोंचा जुगार खेळत आहे. कूपनलिकेचा धंदा तेजीत आहे. एका फुटामागे ७० रूपयेप्रमाणे दर आकारले जातात. त्यात मागील वर्षाच्या तुलनेत १५ रूपयांची वाढ झाली आहे. विहिर खोदाईचे दर ५० फुटाला १ लाख ५० ते ६० हजारांवर गेले आहेत. पिण्याचे तसेच जनावरांना मुबलक पाणी मिळेल या आशेवर हातउसनवारी, खासगी संस्थेकडून कर्ज काढून विहिर खोदाई सुरू आहे. पूर्व भागातील मलढोण, सायाळे, पिंपरवाडी, मीरगाव, दुसंगवाडी, पंचाळे, मिठसागरे, वावी, पांगरी आदी ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा अधिक असल्याने टॅँकरच्या फेºया वाढविण्याची मागणी होत आहे.