हजारो हातांनी साकारले ‘हिरवे भविष्य’
By admin | Published: June 6, 2015 12:31 AM2015-06-06T00:31:56+5:302015-06-06T00:32:10+5:30
फाशीचा डोंगर : अकरा तासांत विक्रमी अकरा हजार रोपांची लागवड
नाशिक : गंगापूर शिवारातील फाशीच्या डोंगरावर लोकसहभागातून अकरा हजार रोपांची लागवड करत ‘मेगा वनमहोत्सव’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी हजारो आबालवृद्धांनी अकरा तासांमध्ये ४५ एकर जागेवर अकरा हजार रोपे लावून ‘सुंदर नाशिक, हरित नाशिक’ ही संकल्पना पर्यावरण दिनाच्या औचित्यावर सार्थकी लावली अन् ‘हिरवे भविष्य’ साकारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
वन विभागाच्या फाशीच्या डोंगरावरील जागेवर आपलं पर्यावरण ग्रुप या पर्यावरणप्रेमी संघटनेच्या वतीने लोकसहभागातून अकरा हजार रोपे लावण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. यासाठी या संघटनेचे सर्व स्वयंसेवक महिनाभरापासून कठोर परिश्रम घेत होते. त्यांच्या परिश्रमाचे फलित म्हणून या ठिकाणी नाशिककरांनी आपले कुटुंब व मित्रपरिवारासह उगवत्या दिनकराच्या साक्षीने पर्यावरणपूरक रोपांच्या लागवडीसाठी धाव घेतली होती. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत प्रत्येक वृक्षप्रेमी नाशिककराने या वनमहोत्सवामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होत पर्यावरणप्रेम व्यक्त केले. शहरातील विविध खासगी इंग्रजी-मराठी माध्यमांच्या शाळांचे विद्यार्थी, महाविद्यालयांचे विद्यार्थी, सेवाभावी संस्थांचे सदस्य, विविध महिला मंडळ, मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक मंडळ, पर्यावरणप्रेमी संस्था, प्राणी-पक्षिप्रेमी संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वनमहोत्सवामध्ये सहभागी झाले होते. तसेच सातपूरमधील विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनीही दुपारच्या वेळेत हजेरी लावून रोपांची लागवड केली. महापौर अशोक मुर्तडक, आमदार सीमा हिरे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी येथे हजेरी लावून वृक्षारोपण केले. (प्रतिनिधी)