इगतपुरीत अडकलेल्या हजारो परप्रांतीयांची मुंबईला रवानगी; सीमाबंदीमुळे पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 12:11 AM2020-03-30T00:11:25+5:302020-03-30T06:29:10+5:30

स्थानिक नागरिकांनी सामावून घेण्यास केला विरोध

Thousands of Indians trapped in Igatpur leave for Mumbai; Police action due to borders | इगतपुरीत अडकलेल्या हजारो परप्रांतीयांची मुंबईला रवानगी; सीमाबंदीमुळे पोलिसांची कारवाई

इगतपुरीत अडकलेल्या हजारो परप्रांतीयांची मुंबईला रवानगी; सीमाबंदीमुळे पोलिसांची कारवाई

Next

नाशिक: मुंबई, ठाणेसह अन्य परिसरातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे निघालेल्या सुमारे सहा हजार नागरिकांसह रेल्वेने सोडलेल्या विशेष रेल्वेत बेकायदेशीररित्या शिरलेल्या सुमारे ५०० प्रवाशांना इगतपुरी येथे रोखण्यात आले असून त्यांची प्रशासनाने दुपारी पुन्हा मुंबईकडे रवानगी केली आहे. मुंबईकडून आलेल्या या जत्थ्याला जिल्ह्याच्या सीमाबंदीमुळे इगतपुरीतच थांबावे लागले आहे. या स्थलांतरितांना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे प्रशासनाने सावध पवित्रा घेत त्यांना परत पाठविण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. त्यामुळे अन्य जिल्ह्यात असलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यात अडचणी येत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, शहापूर कसारा यासह अन्य भागात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक चाकरमाने आणि कष्टकरी वास्तव्यास होते. मात्र आता कोरोनामुळे उद्योग आणि व्यवसाय बंद झाल्याने संबंधितांना मूळ गावी जाण्याची घाई झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या साधनाने आणि बहुतांशी पायपीट करत नागरिक इगतपुरीत आले होते.

मात्र सीमा सील केल्यामुळे त्यांना नाशिकमध्ये प्रवेश करणे कठीण झाले. बाहेरून मोठ्या प्रमाणात नागरिक आल्याने इगतपुरीतील नागरिक धास्तावले. त्यांनी या स्थलांतरितांना हटविण्याची मागणी केली. त्याच दरम्यान इगतपुरी रेल्वे स्थानकात मेंटेनन्स स्टाफसाठी सोडण्यात आलेली गोरखपूर काशी एक्स्प्रेस आली. तिच्यातून जवळपास ४०० ते ५०० अनधिकृत प्रवासीदेखील प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेशामध्ये जाणार होते.

२०० रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सोडण्यात आलेल्या रेल्वेत परप्रांतीय प्रवाशी असल्याची माहिती भुसावळ डिव्हिजनला मिळाल्याने ती गाडी
पुढे न पाठवता इगतपुरीतच थांबवून त्या प्रवाशांना स्थानकावर उतरविण्यात आले.

सुरक्षा बळ जवानांना माहिती मिळाली आणि...

रेल्वेतून व महामार्गावरून आलेल्या परप्रांतीय प्रवाशांची माहिती सुरक्षा बळाच्या जवानांना मिळताच त्यांनी परप्रांतीय प्रवाशांना स्टेशनबाहेर काढले. यावेळी काही प्रवाशांनी मुंबईच्या दिशेने धाव घेतली. मात्र सदर घटनेची माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांना समजताच त्यांनी तात्काळ लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बळाचे जवान तसेच पोलिसांना कळवून पुन्हा परप्रांतीय प्रवाशांना मुंबईहून आलेल्या गाडीत बसविले. सदर गाडी मुंबईमार्गे गोरखपूरला जाणार असल्याची माहिती देऊन दुपारी काशी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली.

Web Title: Thousands of Indians trapped in Igatpur leave for Mumbai; Police action due to borders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.