इच्छुकांनी घेतला झोपडपट्टीचा धसका
By admin | Published: October 18, 2016 02:18 AM2016-10-18T02:18:17+5:302016-10-18T02:53:43+5:30
मनपा निवडणूक : प्रभाग १७ मधून हरकत दाखल
नाशिक : निवडणूक कोणतीही असो, झोपडपट्टीतील मतदार ही हक्काची व्होट बॅँक म्हणून प्रत्येक उमेदवार त्याकडे पाहत आला आहे. निवडणूक काळात झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर होणाºया अर्थकारणाचीही चर्चा होत आलेली आहे. त्यामुळे झोपडपट्टीचा भाग हा काहींना लाभदायक तर काहींना त्रासदायक ठरत आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या प्रभाग रचनेत झोपडपट्टीचा अडसर दूर करण्यासाठी आता इच्छुक हरकती नोंदविण्यासाठी पुढे येत आहेत. त्यानुसार, नाशिकरोड येथील सेनेचे नगरसेवक शैलेश ढगे यांची पहिली हरकत मनपाला प्राप्त झाली आहे. महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या २५ आॅक्टोबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार, सोमवारी पहिली हरकत महापालिका मुख्यालयात दाखल झाली आहे. नाशिकरोड येथील सेनेचे नगरसेवक शैलेश ढगे यांनी सदर हरकत नोंदविली आहे. नवीन रचनेनुसार ढगे यांचा प्रभाग क्रमांक १७ आहे. सदर प्रभागामध्ये कॅनालरोडवरील झोपडपट्टीचा समावेश करण्यात आल्याने ढगे यांची चिंता वाढली आहे. सदर झोपडपट्टी ही प्रभाग क्रमांक २०ला जोडणे अपेक्षित होते, अशी सूचना ढगे यांनी केली आहे. कॅनॉलरोडवरील झोपडपट्टी ही डी.पी. रोड ओलांडून प्रभाग १७ मध्ये टाकण्यात आल्याने नैसर्गिक खुणांचे उल्लंघन झाले असल्याचे ढगे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सदर झोपडपट्टी ही प्रभाग १७ मधून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे. ढगे यांच्या हरकतीवरुन इच्छुकांनी झोपडपट्टीतील मतदारांचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येते. कॅनॉलरोडवरील आम्रपाली झोपडपट्टी ही शहरातील सर्वांत मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये दुसºया क्रमांकाची मानली जाते. (प्रतिनिधी)