हजारो लिटर पाणी सिडकोच्या रस्त्यावर
By admin | Published: November 3, 2015 10:43 PM2015-11-03T22:43:50+5:302015-11-03T22:47:28+5:30
मनपाचे दुर्लक्ष : चार दिवसांपासून गळती सुरुच
सिडको : एकीकडे नाशिकच्या पाण्याची पळवापळवी सुरू असताना याला सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांकडून विरोध दर्शविला जात आहे, तर दुसरीकडे मात्र महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोत हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार घडत आहे.
सिडकोतील पवननगर भागातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या व्हॉल्व्हमधून गेल्या
तीन-चार दिवसांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. सिडकोत अनेक ठिकाणच्या व्हॉल्व्हमधून पाणी वाया जाण्याचे प्रकार हे नित्याचेच आहे. याबरोबरच पाइपलाइन गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जाण्याचे प्रकारही कायमच घडत असतात. परंतु यानंतरही मनपा अधिकारी मात्र याकडे डोळेझाक कारीत असल्याचे या आधीही उघड झाले आहे.
पवननगर ते रायगड चौक दरम्यान हरीष हार्डवेअरसमोरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या चेंबरमधील व्हॉल्व्ह गेल्या तीन दिवसांपासून खराब झाल्याने यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असतानाही मनपा प्रशासनातील अधिकारी मात्र याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सिडकोतील मनपा अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे काही भागात कमी दाबाने तर काही भागात मुबलक पाणीपुरवठा केला जातो. यामुळे मनपाच्या गलथान कारभारामुळे ज्या भागात प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होतो त्या भागातील गल्ली बोळातील रस्त्यांवर सकाळच्या सुमारास पाण्याचा सडाच पडलेला दिसतो. एकूणच सिडको भागात पाणीपुरवठ्याबाबत नियोजन नसल्याने व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा अपव्यय यापुढेही होऊ शकतो. यामुळे सिडकोतील सर्व नागरिकांना समसमान व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी व सिडकोतील कायमच होत असलेल्या पाणी गळतीवर नियंत्रण आणण्यासाठी मनपा आयुक्तांनीच याकडे लक्ष घालण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)