थकबाकीदार बीएसएनएलमुळे हजारो मोबाईल ‘नॉट रिचेबल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 05:27 PM2019-11-28T17:27:55+5:302019-11-28T17:28:15+5:30
पाटोदा केंद्राचा वीजपुरवठा खंडित : संपर्कसेवा बंद पडल्याने गैरसोय
पाटोदा : गेल्या जुलै महिन्यापासून विज बिल थकविल्यामुळे वितरण कंपनीने पाटोदा येथील बीएसएनएल कार्यालयाचा विज पुरवठा खंडित केल्याने गेल्या तीन दिवसांपासून येथील शेकडो दूरध्वनी व सुमारे पाच हजाराहून अधिक मोबाईल ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला असून दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येत असल्याने ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पाटोदा येथे बीएसएनएलचे केंद्र असून गावात शंभरपेक्षा जास्त दूरध्वनी ग्राहक असून सुमारे सहा ते सात हजार मोबाइलधारक बीएसएनएलची सेवा वापरत आहेत. विज वितरण कंपनीकडून या कार्यालयाला विज पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या जुलै महिन्यापासून बीएसएनएलने विज बिल न भरता सुमारे दोन लाख ११ हजार रु पयांचे वीज बिल थकविले आहे. शिवाय मागीलही काही लाख रु पये थकबाकी असल्याने वारंवार सूचना देऊनही बिल भरण्यास टाळाटाळ होत असल्याने विज वितरण कंपनीने कठोर कारवाई करीत बुधवारपासून केंद्राचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे पाटोदा गावासह ठाणगाव, पिंपरी,आडगाव रेपाळ, कानडी, विखरणी, दहेगाव पाटोदा, शिरसगाव लौकी या भागातील संपूर्ण दूरध्वनी तसेच मोबाईल सेवा बंद पडली आहे. संपर्क सेवाच बंद झाल्याने नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल होत आहेत. चार पाच महिन्यापूर्वीही या कार्यालयाचा सुमारे महिनाभर वीज पुरवठा खंडित होता. केंद्राने वीज बिल भरावे यासाठी ग्राहकांना आंदोलन करावे लागले होते. या महिनाभराच्या कालावधीतील दूरध्वनी बिले मात्र ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा खंडित विजपुरवठ्यामुळे कनेक्टीव्हिटी नसल्याने पाटोदा येथील सर्व आॅनलाइन सेवा तसेच बँकेचे बीसी केंद्र बंद पडले आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे.