नाशिक जिल्ह्यात उपचारार्थी पुन्हा हजारपार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:18 AM2021-08-22T04:18:10+5:302021-08-22T04:18:10+5:30
नाशिक : गत वर्षभराच्या कालावधीनंतर १ हजाराखाली गेलेली उपचारार्थी रुग्णसंख्या शनिवारी (दि. २१) पुन्हा हजाराच्या पल्याड पोहोचली आहे. शनिवारी ...
नाशिक : गत वर्षभराच्या कालावधीनंतर १ हजाराखाली गेलेली उपचारार्थी रुग्णसंख्या शनिवारी (दि. २१) पुन्हा हजाराच्या पल्याड पोहोचली आहे. शनिवारी कोरोनामुक्तांची संख्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत १५ ने कमी राहिल्याने उपचारार्थी रुग्णसंख्येत ही वाढ झाली आहे.
शनिवारी जिल्ह्यात ११८ रुग्ण नव्याने बाधित तर १०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन बाधितांमध्ये नाशिक ग्रामीणचीच संख्या ८६ असून ३० नाशिक मनपाची तर मालेगाव मनपा आणि जिल्हाबाह्यच्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. गतवर्षी पहिल्या लाटेच्या प्रारंभीच्या टप्प्यात जून महिन्यात प्रथमच उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजाराच्या वर गेली होती. तेव्हापासून अनेकदा उपचारार्थी रुग्णसंख्येत वाढ-घट झाली असली तरी एकूण उपचारार्थी संख्या हजारापेक्षा कमी झाली नव्हती. शुक्रवारी तब्बल वर्षभराच्या काळानंतर एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजारपेक्षा सहाने कमी होऊन ९९४ पर्यंत खाली आली होती. मात्र, त्यात शनिवारी पुन्हा वाढ होऊन उपचारार्थी संख्या हजाराच्या वर पोहोचल्याने कोरोना पुन्हा वाढणार का, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. जिल्ह्यात केवळ नाशिक मनपा क्षेत्रात एका नागरिकाचा बळी गेला असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या ८५५९ वर पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्यादेखील ६१० वर आली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे ३५४, नाशिक मनपाचे १३२ तर मालेगाव मनपाचे १२४ अहवाल प्रलंबित आहेत.
इन्फो
कोरोनामुक्तचे प्रमाण ९७.६४ वर कायम
जिल्ह्यात बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त नागरिकांच्या संख्येत अल्पशी घट येऊनही कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९७.६४ टक्क्यांवर कायम आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्राचे प्रमाण सर्वाधिक ९८.०५, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे कोरोनामुक्तचे प्रमाण ९७.६८, नाशिक ग्रामीणचे ९७.०२ तर मालेगाव मनपाचे प्रमाण ९६.८४ टक्के इतके आहे.