देशभरात नवीन हजार ई-बाजार समित्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:25 AM2021-02-06T04:25:08+5:302021-02-06T04:25:08+5:30
नाशिक : केंद्रीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याणच्या वतीने देशभरात एक हजार नवीन ई-बाजार समित्या स्थापित करण्यात आल्या आहेत. ...
नाशिक : केंद्रीय कृषी मंत्रालय आणि शेतकरी कल्याणच्या वतीने देशभरात एक हजार नवीन ई-बाजार समित्या स्थापित करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय कृषी बाजार अर्थात ई-नामच्या वतीने या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार देशभरातील १८ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून या ई-बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळेल, ते समजू शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिथे अधिक भाव मिळेल, तिथे त्यांचा माल विकणे शक्य होणार आहे. आतापर्यंत देशभरातील १ कोटी ६९ लाख शेतकरी आणि १ कोटी ५५ लाख व्यापाऱ्यांनी या ई-नामवर नोंदणी केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट पैसे मिळण्याचीदेखील सुविधा मिळणार असल्याने त्यांची आर्थिक फसवणूक होण्याचा संभाव्य धोकादेखील त्यातून टाळण्यात आलेला आहे. या ई-बाजार समित्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता नजीकच्या भविष्यात अजून १ हजार ई-बाजार समित्या स्थापन करण्याची घोषणादेखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली आहे.