नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो अग्नीवीर दाखल; सैनिकी प्रशिक्षणाचा 'स्टार्टअप'
By अझहर शेख | Published: January 7, 2023 06:24 PM2023-01-07T18:24:58+5:302023-01-07T18:27:10+5:30
भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी या योजनेतून युवकांना देण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशभरात २५ हजार तरुणांना अग्निवीर म्हणून सैन्यात भरती केले जात आहे.
नाशिक : भारत सरकारने सैन्यदलात सेवा बजावण्यासाठी इच्छुक असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निविरांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मागील वर्षी जून महिन्यात केली होती. याअंतर्गत नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रात देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण दाखल होत आहेत. आठवडाभरापूर्वी दाखल झालेल्या तरुणांचे प्रशिक्षण सत्रदेखील सुरू झाले आहे. याठिकाणी तोफखान्याचे कमान्डंट ब्रिगेडियर अे.रागेश यांच्या नेतृत्वाखाली अग्निविरांसाठी सुसज्ज यंत्रणा उभारण्यात आली आहे, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल एस.के.पांडा यांनी शनिवारी (दि.७) पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी या योजनेतून युवकांना देण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशभरात २५ हजार तरुणांना अग्निवीर म्हणून सैन्यात भरती केले जात आहे.
जयभवानी रोडवरील अशोकचक्र प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच डाव्या हाताला स्वतंत्र प्रशस्त्र असे ‘अग्निवीर रिसेप्शन सेंटर’ उभारण्यात आले आहेत. याठिकाणी स्वागतफलक तसेच बंदुकधारी सैनिकांचे ॲक्शनमोडमधील छायाचित्रांचे फलकदेखील तरुणांची ऊर्जा वाढविण्यासाठी लावण्यात आले आहेत. या केंद्रातून त्यांचे बायोमॅट्रिक तपाासणीपासून तर सर्व मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यापर्यंत तसेच भारतीय सैन्यदलाचा देदिप्यमान इतिहासावर प्रकाशझोत टाकणारा लघुपट दाखविण्यापर्यंत सर्व काही प्रक्रिया पार पाडली जाते. यासाठी येथे लेफ्टनंट कर्नल निखिल पी., यांची नेमणूक करण्यात आली आहे. तोफखाना केंद्रात प्रवेश केल्यानंतर रिसेप्शन सेंटरमध्ये अग्निवीर तरुणांची कायदेशीर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतर येथून पुढे त्यांना त्यांच्या निवास कक्षात जवान घेऊन जातात.
या चार पदांवर सेवा बजावण्याची संधी
ताेफखाना केंद्रातून प्रशिक्षण घेणाऱ्या अग्निवीरांना भारतीय सैन्यात तोफा चालविणारा गनर, तांत्रिक सहाय्यक (टेक्निकल असिस्टंट), रेडिओ ऑपरेटर, मोटार ड्रायव्हर या चार महत्वाच्या पदांवर सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. यासाठी मुलभूत शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांकडून दिले जात आहे. यामध्ये १० आठवड्यांचे प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण व २१ आठवड्यांचे ॲडव्हान्स सैनिकी प्रशिक्षणाचा समावेश आहे. एकुण ३१आठवड्यांचा प्रशिक्षण कालावधी राहणार असल्याचे पांडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.