हजारो भाविक त्र्यंबकनगरीकडे रवाना : हरहर महादेव..., जय भोले...बम बम भोले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:24 AM2018-08-27T01:24:10+5:302018-08-27T01:24:45+5:30
हरहर महादेव..., जय भोले...बम बम भोले...चा जयघोष करीत हजारो भाविक तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला शहरातून त्र्यंबकनगरीकडे रवाना झाले. तिसºया श्रावणी सोमवारनिमित्त दरवर्षी त्र्यंबकराजाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
नाशिक : हरहर महादेव..., जय भोले...बम बम भोले...चा जयघोष करीत हजारो भाविक तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला शहरातून त्र्यंबकनगरीकडे रवाना झाले. तिसºया श्रावणी सोमवारनिमित्त दरवर्षी त्र्यंबकराजाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या औचित्यावर मध्यरात्रीपासून ब्रह्मगिरी पर्वताभोवती प्रदक्षिणा घालण्यास भाविकांनी सुरुवात केली होती. ‘त्र्यंबक यात्रा’ कॅच करण्यासाठी महामंडळाच्या नाशिक विभागाने २७५ बसेस नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर सोडल्या होत्या. व्रतवैकल्य, उपासना, सण-उत्सवांचे पर्व म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. श्रावण महिना उजाडताच भाविकांना वेध लागते ते ब्रह्मगिरी फेरीचे. श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरांमध्ये भाविकांची लगबग पहावयास मिळाली. तिसºया श्रावणी सोमवारच्या औचित्यावर ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि कुशावर्तामध्ये स्नान करण्याकरिता मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकनगरीत पूर्वसंध्येला पोहचले होते. मध्यरात्री बारा वाजता हरहर महादेव... बम बम भोलेचा जयघोेष करीत हजारो भाविकांनी ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला सुरुवात केली. यंदा मेळा बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून जुन्या मध्यवर्ती बसस्थानकावर वाढलेला ताण लक्षात घेता यावर्षी नाशिक विभागाकडून त्र्यंबक रस्त्यावरील इदगाह मैदानावरून त्र्यंबकेश्वरसाठी जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते.
दुपारपासून आगारमधून बसेस मैदानावर दाखल होत होत्या. त्र्यंबक यात्रेसाठी मैदानावर सुमारे दोनशेहून अधिक बसेस संध्याकाळपर्यंत पोहचल्या होत्या. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर भाविकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. इदगाह मैदानावर मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वरकडे रवाना होण्यासाठी दाखल होत होते. एकापाठोपाठ एक बसेस अवघ्या सात ते आठ मिनिटांत भरून त्र्यंबकेश्वरकडे रवाना होत होते. भाविकांची गर्दी वाढल्यानंतर मैदानाच्या जिल्हा रुग्णालयाकडील प्रवेशद्वारापासून लाकडी बॅरिकेडमधून भाविकांना सोडले जात होते. या प्रवेशद्वारामधून भाविकांना घेऊन जाणाºया बसेस बाहेर पडत होत्या. त्र्यंबकेश्वरकडून येणाºया बसेस शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागून मैदानात प्रवेश करत होत्या. सुमारे ५५० चालक-वाहकांनी योगदान देत त्र्यंबक यात्रा यशस्वीपणे पार पाडली.
उपनगरांमधून प्रायोगिक बसफेºया
त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी जाणाºया भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपनगरीय भागातूनही प्रायोगिक तत्त्वावर बसफेºयांचे नियोजन करण्यात आले होते. दोन आगारांमार्फत शिवाजी चौक, विजयनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौकमार्गे तीन फेºया प्रायोगिक तत्त्वावर त्र्यंबकेश्वरसाठी चालविण्यात आल्याचे समजते. तसेच नाशिकरोड स्थानकातूनही काही बसेस त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाल्या.
भाविकांची मांदियाळी...
तिसºया श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीच्या फे रीने भगवान शंकराच्या भक्तांना साद घातली आणि त्र्यंबकराजाच्या नगरीत भाविकांची मांदियाळी पहावयास मिळाली. रविवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत भाविकांचा ओघ त्र्यंबकेश्वरकडे सुरू होता. यामुळे लाखो भाविक त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी दाखल झाले आहेत. त्र्यंबक नगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचे चित्र आज पहावयास मिळणार आहे. रिमझिम पावसाच्या सरींनी अवघा परिसर न्हाऊन निघाला असून, हिरवाईने नटला आहे. जणू हिरवा साज परिधान करून त्र्यंबकनगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याची अनुभूती येत आहे.
बसेस थेट त्र्यंबक स्थानकापर्यंत
राज्य परिवहन महामंडळाच्या ‘त्र्यंबकेश्वर यात्रा’ असे स्टिकर लावलेल्या सर्व बसेसनी नाशिकहून थेट त्र्यंबकेश्वर बसस्थानकापर्यंत भाविकांना सेवा पुरविली. सर्व बसेसला बसस्थानकापर्यंत परवानगी देण्यात आली होती; मात्र नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणाºया खासगी वाहनांना खंबाळेपासून पुढे बंदी घालण्यात आली होती. खंबाळेहून पुढे जाण्यासाठी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच मुंबई, घोटी-इगतपुरीकडून येणाºया वाहनांना पहिनेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. जव्हार-मोखाडामार्गे येणारी सर्व वाहने अंबोलीपर्यंत येत होती. खंबाळे, अंबोली, पहिने या गावांपासून पुढे केवळ महामंडळाच्या बसेसला त्र्यंबकेश्वरपर्यंत सोडले जात होते.
उत्साह शिगेला
त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी जाणाºया भाविकांचा उत्साह शिगेला पोहचल्याचे चित्र पूर्वसंध्येला शहरात पहावयास मिळाले. हरहर महादेव, जय भोले असे घोषवाक्य लिहिलेले टी-शर्ट युवकांनी परिधान केले होते. तसेच हरहर महादेवचा जयघोष करत भाविक बसेसद्वारे त्र्यंबकेश्वरला जात होते. संध्याकाळी सात वाजेनंतर इदगाह मैदानाकडे जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते.