‘बम बम भोले’चा जयघोष करीत हजारो भाविक त्र्यंबकनगरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 09:10 PM2018-08-26T21:10:06+5:302018-08-26T21:14:34+5:30
तीस-या श्रावणी सोमवारच्या औचित्यावर ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि कुशावर्तामध्ये स्नान करण्याकरिता मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकनगरीत पुर्वसंध्येला पोहचले होते.
नाशिक : हर हर महादेव..., जय भोले...बम बम भोले...चा जयघोष करीत हजारो भाविक तीसऱ्या श्रावणी सोमवारच्या पुर्वसंध्येला शहरातून त्र्यंबकनगरीकडे रवाना झाले. तीस-या श्रावणी सोमवारनिमित्त दरवर्षी त्र्यंबकराजाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या औचित्यावर मध्यरात्रीपासून ब्रम्हगिरी पर्वताभोवती प्रदक्षिणा घालण्यास भाविकांनी सुरूवात केली होती. ‘त्र्यंबक यात्रा’ कॅच करण्यासाठी महामंडळाच्या नाशिक विभागाने २७५ बसेस नाशिक-त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गावर सोडल्या होत्या.
व्रतवैकल्य, उपासना, सण-उत्सवांचे पर्व म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. श्रावण महिना उजाडताच भाविकांना वेध लागते ते ब्रम्हगिरी फेरीचे. श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरांमध्ये भाविकांची लगबग पहावयास मिळाली. तीस-या श्रावणी सोमवारच्या औचित्यावर ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि कुशावर्तामध्ये स्नान करण्याकरिता मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकनगरीत पुर्वसंध्येला पोहचले होते.
यंदा मेळा बसस्थानकाच्या नुतनीकरणाचे विकासकाम सुरू असून जुन्या मध्यवर्ती बसस्थानकावर वाढलेला ताण लक्षात घेता यावर्षी महामंडळाच्या नाशिक विभागाकडून त्र्यंबक रस्त्यावरील ईदगाह मैदानावरून त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. दुपारपासून आगारामधून बसेस मैदानावर दाखल होत होत्या. त्र्यंबक यात्रेसाठी मैदानावर सुमारे दोनशेहून अधिक बसेस संध्याकाळपर्यंत पोहचल्या होत्या. संध्याकाळी साडे पाच वाजेनंतर भाविकांची गर्दी वाढण्यास सुरूवात झाली. ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वरकडे रवाना होण्यासाठी दाखल होत होते. एकापाठोपाठ एक बसेस अवघ्या सात ते आठ मिनिटांत भरून त्र्यंबकेश्वरकडे रवाना होत होते. भाविकांची गर्दी वाढल्यानंतर मैदानाच्या जिल्हा रुग्णालयाकडील प्रवेशद्वारापासून लाकडी बॅरिकेडमधून भाविकांना सोडले जात होते. या प्रवेशद्वारामधून भाविकांना घेऊन जाणा-या बसेस बाहेर पडत होत्या. त्र्यंबकेश्वरकडून येणा-या बसेस शासकिय विश्रामगृहाच्या पाठीमागून मैदानात प्रवेश येत होत्या. सुमारे ५५० चालक-वाहकांनी योगदान देत त्र्यंबक यात्रा यशस्वीपणे पार पाडली.
आनंदाला उधाण; उत्साह शिगेला
त्र्यंबकेश्वरला ब्रम्हगिरी प्रदक्षिणा आणि त्र्यंबकराजाचे दर्शनासाठी जाणा-या भाविकांचा उत्साह शिगेला पोहचल्याचे चित्र पुर्वसंध्येला शहरात पहावयास मिळाले. हर हर महादेव, जय भोले असे घोषवाक्य लिहिलेली टी-शर्ट युवकांनी परिधान केले होते. तसेच हर हर महादेवचा चा जयघोष करत भाविक बसेसद्वारे त्र्यंबकेश्वरला जात होते. संध्याकाळी सात वाजेनंतर ईदगाह मैदानाकडे जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते.