१४, १५ डिसेंबरला नाशकातून हजारो आंदोलक मुंबईत धडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:30 AM2020-12-13T04:30:55+5:302020-12-13T04:30:55+5:30
नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सोमवार (दि. १४) व मंगळवार (दि. १५) दोन दिवसीय ठिय्या आंदोलन ...
नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सोमवार (दि. १४) व मंगळवार (दि. १५) दोन दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून, मुंबईत होणाऱ्या या ठिय्या आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने मराठा आंदोलक बांधव एकवटणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी दिली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या गुरुवारी (दि. १०) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत राज्यभरातील शंभर समन्वयकांनी सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणासंदर्भात सुरू असलेली सुनावणी लक्षात घेत चर्चा केली. त्याचप्रमाणे सरकारवर दबाव निर्माण कऱण्यासाठी आझाद मैदान येथे १३ व १४ डिसेंबरला स्थगिती आदेशापूर्वीपासूनत नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले २१८५ तालाठी उमेदवार, मेट्रो, राज्यसेवा, महावितरण भरतीतील एसईबीसी मराठा उमेदवार उपोषण करणार आहेत. या उमेदवारांचा नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावून सर्व पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यात यावी, त्यांना वगळून तलाठी, मेट्रो, महावितरणमध्ये नियुक्ती देण्याचा घाट राज्य सरकारने घातल्याचा आरोप करतानाच विधिमंडळातील आमदारांनी या उमेदवारांचे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून सोडवावेत, असे आवाहन सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर शक्य त्या मराठा आंदोलकांनी आझाद मैदान येथे आंदोलक मराठा विद्यार्थ्यांना पाठिंब्यासाठी भेट द्यावी, असे आवाहनही मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातून हजारो मराठा आंदोलक आझाद मैदानावर धडकणार असल्याची माहीती नाशिकमधील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे. या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले, उमेश शिंदे, आशीष हिरे, संजय सोमासे, पुंडलिक बोडके, संजय फडोळ, माधवी पाटील, अस्मिता देशमाने पूजा धुमाळ आदी उपस्थित होते.
इन्फो-
अधिवेशनामध्ये तलाठी, मेट्रो, राज्यसेवा, महावितरण, विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटत नसेल तर सर्व आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घ्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क साधण्याचे आवाहनही मराठा आंदोलकांना करण्यात आले असून, नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चा प्रत्येक आमदाराला या संदर्भात निवेदन देणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिली आहे.