आरटीईच्या अजूनही हजारो जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:20 AM2021-08-18T04:20:17+5:302021-08-18T04:20:17+5:30
आरटीईअंतर्गत नाशिक जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास येते. मात्र, यावर्षी १५ ऑगस्ट उलटूनही आरटीईअंतर्गत राबविली जाणारी प्रवेश प्रक्रिया ...
आरटीईअंतर्गत नाशिक जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास येते. मात्र, यावर्षी १५ ऑगस्ट उलटूनही आरटीईअंतर्गत राबविली जाणारी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. जिल्ह्यात मंगळवारी (दि. १७) सायंकाळपर्यंत ३ हजार २०८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अजूनही १ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळूनही त्यांनी प्रवेश घेतलेला नाही. या विद्यार्थ्यांच्या पालकांना वारंवार वाढीव मुदत देऊनही त्यांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम मुदत ३१ जुलैला संपलेली असून, त्यानंतरही १ हजार ३३६ रिक्त जागा उपलब्ध आहेत. परंतु, या रिक्त जागांवर प्रवेशासाठी आरटीईच्या संकेतस्थळावर अथवा शिक्षण विभागाकडून कोणतीही सूचना करण्यात आलेली नाही. त्यामुळे लॉटरीत निवड होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन आरटीई अंतर्गत प्रवेश मिळण्याची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. या विद्यार्थ्यांची प्रवेशाची प्रतीक्षा संपणार केव्हा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरटीई प्रवेशाची स्थिती
जिल्ह्यातील शाळा - ४५०
उपलब्ध जागा - ४५४४
एकूण अर्ज - १३३३०
लॉटरीत निवड - ४२०८
निश्चित प्रवेश - ३२०८
रिक्त जागा - १३३६