सामाजिक बांधिलकीसाठी हजारो नाशिककर धावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 07:12 PM2020-01-11T19:12:52+5:302020-01-11T19:13:29+5:30
महात्मानगर येथील मैदानावर सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास क्रीडापटंूच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करुन आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून नाशिक रनची सुरुवात करण्यात आली. महात्मानगर क्रीडांगण ते पारिजातनगर, जेहान सर्कल, स्वामी समर्थ चौक, नंदन स्वीटस मार्गे पुन्हा महात्मानगर क्रीडांगणावर नाशिक रनचा समारोप करण्यात आला.
लोकमत न्युज नेटवर्क
सातपूर : सामाजीक बांधिलकीच्या उद्देशाने समाजातील गरजू घटकांना मदत व्हावी म्हणून नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित अठराव्या नाशिक रनमध्ये शनिवारी पंधरा हजाराहून अधिक नाशिककर सुदृढ आरोग्याचा मूलमंत्र देत गुलाबी थंडीत धावले. तर यावर्षी प्रथमच आयोजित दहा किलोमीटर नाशिक रन मॅरेथॉन मध्ये २५० पेक्षा अधिक नाशिककरांनी सहभाग नोंदविला.
महात्मानगर येथील मैदानावर सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास क्रीडापटंूच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करुन आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून नाशिक रनची सुरुवात करण्यात आली. महात्मानगर क्रीडांगण ते पारिजातनगर, जेहान सर्कल, स्वामी समर्थ चौक, नंदन स्वीटस मार्गे पुन्हा महात्मानगर क्रीडांगणावर नाशिक रनचा समारोप करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पंधराहजाराहून अधिक नाशिककर सुदृढ आरोग्याचा मूलमंत्र देत समाजसेवेच्या उदात्त हेतूने धावले. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सतीश कुलकर्णी, बॉश इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौमित्र भट्टाचार्य, सह संचालक एस.सी.श्रीनिवासन, पॉवर ट्रेन बॉशचे विभागीय अध्यक्ष जॉन ओलिव्हर, जर्क बरन्ड, कर्स्टन म्युलर, संदीप नालामंगला, टीडीके इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एन.बालाकृष्णन, नाशिक रनचे अध्यक्ष एच.एस.बॅनर्जी, रमेश जी.आर., अनिल दैठणकार, राजाराम कासार, प्रबल रे, अनंथरामन,अशोक पाटील, श्रीकांत चव्हाण, मुकुंद भट, कल्लोल सहा, अविनाश देशपांडे, डॉ वेंकटेश, राजू गाढवे, संजय मोदी, विवेक झंकार आदी उपस्थित होते. यावेळी आयर्न मॅन किशोर घुमरे, महेंद्र छोरिया, प्रशांत डबरी, डॉ.अरुण गचाले यांच्यासह सर्व आयर्न मॅनचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. रन मध्ये सहभागी झालेल्यासाठी १५ लकी ड्रॉ काढण्यात आले. विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रथम विजेत्यास २८ हजार रुपये किमतीची मोटर सायकल, द्वितीय विजेत्यास १८ हजार रुपये किमतीची गिअर बाईक, तृतीय विजेत्यास १७ हजार रुपये किमतीचा एलसीडी टीव्ही आदींसह विविध बक्षीसांचे वाटप करण्यात आले.
महात्मानगर येथील मैदानावर सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान नाशिक रन मॅरेथॉन घेण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये पोलिक आयुक्त विश्वास नागरे यांचेसह विविध क्षेत्रातील २५० च्यावर विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. ही मॅरेथॉन महात्मा नगर क्रीडांगण, जेहान सर्कल, पाटील लॉन्स, सोमेश्वर मार्गे पुन्हा महात्मानगर क्रीडांगण अशी १० किलोमीटर अंतराची होती. नाशिक रन विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे मुख्य समन्वयक विजय काकड, रोहन तांदळे, संतोष जोशी, उमेश ताजनपुरे, स्नेहा ओक, डॉ.अर्चना सायगावकर,आदित्य अवस्थी,जतीन सुळे, शरद गीते आदींसह ४०० स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. नाशिक रनचे सचिव अनिल दैठणकर यांनी आभार मानले.