शिवसेनेचे खूपच आस्ते कदम!
By किरण अग्रवाल | Published: September 30, 2018 12:43 AM2018-09-30T00:43:28+5:302018-09-30T00:46:18+5:30
अलीकडच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष लोकांचे प्रश्न हाती घेऊन रस्त्यावर उतरत असताना शिवसेना मात्र आवाज हरविल्यागत आस्ते कदम टाकताना दिसत आहे. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असूनही या पक्षाची आक्रमकता नजरेस पडत नाही. संघटनात्मक पदाधिकारीही सुस्त असल्याचे दिसते. अशाने या पक्षाला स्वबळ सिद्ध करणे शक्य आहे का, हा प्रश्नच ठरावा.
अलीकडच्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष लोकांचे प्रश्न हाती घेऊन रस्त्यावर उतरत असताना शिवसेना मात्र आवाज हरविल्यागत आस्ते कदम टाकताना दिसत आहे. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असूनही या पक्षाची आक्रमकता नजरेस पडत नाही. संघटनात्मक पदाधिकारीही सुस्त असल्याचे दिसते. अशाने या पक्षाला स्वबळ सिद्ध करणे शक्य आहे का, हा प्रश्नच ठरावा.
येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह साऱ्या राजकीय पक्षांची सक्रियता वाढून गेली असताना स्वबळाची घोषणा करून बसलेल्या शिवसेनेत मात्र स्वस्थता दिसून यावी हे आश्चर्याचेच म्हणता यावे. विशेषत: संघटनात्मक पातळीवरील खांदेपालटानंतर नवीन पदाधिकारी जोमाने कामाला लागतात हा सार्वत्रिक अनुभव आहे; परंतु शिवसेनेत तसेही काही होताना दिसत नाही. उलट अलीकडेच केल्या गेलेल्या काही निवड-नियुक्त्यांवरून नाराजीचा पोळा फुटून गेला आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात प्रभावी विरोधी पक्ष म्हणून पुढे आलेल्या शिवसेनेला नेमके झालेय काय, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरून गेले आहे.
नाशिक महापालिकेच्या गेल्या निवडणुकीपूर्वी राजकीय सक्रियतेत शिवसेना आघाडीवर होती. दर आठवड्या-पंधरवड्यात कसल्या न कसल्या मुद्द्यावरून आंदोलन, निवेदन वगैरे सुरू असे; परंतु महापालिकेतील सत्तेत जाता न आल्यामुळे गेल्या वर्षभरात या पक्षात सुस्ती आली. विशेष म्हणजे, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून बाकी सारे पक्ष कामाला लागलेले दिसत आहेत. यासंदर्भाने शिवसेनेने स्वत:हून स्वबळाची घोषणाही करून झाली आहे; परंतु ते सिद्ध करण्यासाठी पक्ष-संघटनात्मक पातळीवर जी सिद्धता असायला हवी, ती काही दिसून येत नाही. आक्रमकता हा तर या पक्षाचा स्थायिभाव राहिला आहे; परंतु तो पुरता लोपल्याचे चित्र आहे. मध्यंतरी सहाएक महिन्यांपूर्वी पक्षाने महानगरप्रमुख पदांवरील व्यक्तींचा खांदेपालट केला. मूळ व निष्ठावान म्हणविणाºया सचिन मराठे यांना व त्यांच्या जोडीला महेश बडवे यांच्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले. त्यामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत होते. नव्या-जुन्यांची सांगड घालून पक्ष बैठका होताना दिसत होत्या. परंतु लोकांसमोर येण्यासाठी लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणे जे अपेक्षित असते, ते काही दिसून येऊ शकले नाही.
बरे, प्रश्न किंवा समस्या काही कमी आहेत, अशातलाही भाग नाही. शिवसेनेसाठी तसे पाहता आजघडीला भाजपा हा क्रमांक एकचा प्रतिस्पर्धी आहे. या भाजपाचीच नाशिक महापालिकेत सत्ता आहे. तेथे करवाढ व शहर बससेवा ताब्यात घेण्यासारखे विषय असताना त्याबाबत हवी तशी आक्रमकता दिसली नाही. नाशिकच्या विमानसेवेसाठी शिवसेनेचेच खासदार दिल्लीत आंदोलन करतात; परंतु गावातील बससेवेच्या विषयाबाबत गटनेत्यांच्या भूमिकेखेरीज पक्षाची म्हणून कसली बाजू समोर येत नाही. स्वाइन फ्लूमुळे गेल्या दोन महिन्यात सुमारे ३० जणांचा बळी गेला. डेंग्यूच्या तापाने शेकडो फणफणले असून, यावर्षी म्हणजे जानेवारी ते आतापर्यंतच्या नऊ महिन्यात जवळपास ५०० जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. पण, महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून बसणाºया शिवसेनेचा जणू घसा बसला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रवादीचे एकवेळ ठीक; पण काँग्रेसची ताकद तर नाशकात तशी मर्यादित आहे, मात्र अलीकडे इंधन दरवाढ असो, की राफेल विमान खरेदीचा घोटाळा; काँगे्रसने मोर्चे आदी उपक्रमशीलता दाखवून जनमानसात वेगाने आपल्याबद्दलची विश्वासार्हता निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पुढच्या आठवड्यात त्यांची संघर्ष यात्राही येऊ घातली आहे. भुजबळ जामिनावर बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादीनेही महापालिकेवर मोर्चा नेऊन मध्यंतरी गेलेले आपले अवसान पुन्हा आणण्याची धडपड केली. स्वाइन फ्लू व डेंग्यूच्या वाढत्या प्रसाराकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी औषध फवारणीची गांधीगिरीही केली. गेला बाजार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वंदे गुजरात चॅनलवरून शिक्षकांची शिकवणी घेण्यावरून गरबा खेळून आंदोलन केले. पण, शिवसेना कुठे हरवली? खरेच स्वबळ आजमावयाचे आहे, की अखेरीस भाजपासोबतच जावे लागेल म्हणून द्विधामन:स्थितीतून ही सुस्तता व शांतता ओढवली आहे, अशी शंका घेण्यास त्यामुळेच संधी मिळून गेली आहे.
आश्चर्याची बाब अशी की, जनतेच्या प्रश्नांसाठी अन्य पक्ष रस्त्यावर उतरू लागले असताना आक्रमकतेचे ‘पेटंट’ असलेली शिवसेना ‘व्हॉइस आॅफ नाशिक’सारखे कार्यक्रम घेण्यात दंग दिसली. युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आरोग्य व स्वसंरक्षण शिबिरांच्या माध्यमातून सामाजिक भान दर्शविले; परंतु त्याव्यतिरिक्त लोकांचा व्हॉइस ठरणाºया शिवसेनेचा आवाज मात्र हरवलेला दिसतोय. लोकांचेही जाऊ द्या, प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचेही स्थानिक पदाधिकाºयांना सुचले नाही. पक्ष सभासद नोंदणीचे अर्जही पडून आहेत म्हणे. एका विधानसभा मतदारसंघातील, म्हणजे मध्य नाशिकमधील पक्ष पदाधिकारी नेमले गेले तर त्याबाबत आरडा-ओरड सुरू आहे. ‘जम्बो’ स्वरूपात सर्वांनाच संधी देऊनही नाराजी घडून आली. त्यामुळे वाटचाल जणू थबकून गेली. तेव्हा, पक्षप्रमुखांचे स्वबळाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे असेल तर अशा सुस्ततेने कसे चालेल?