बंद मॉलमुळे दीड हजार युवक बेरोजगार
By admin | Published: February 27, 2016 11:07 PM2016-02-27T23:07:34+5:302016-02-27T23:59:42+5:30
समस्या : रिटेलर्स तेजीत, परंतु स्थानिक कारणांचा अडसर; नव्या रोजगारांचा शोध
नाशिक : एकापाठोपाठ एक शहरात येऊ घातलेल्या मॉल्समुळे रिटेलर क्षेत्रात मिळालेल्या रोजगाराच्या संधी अचानक बंद पडणाऱ्या मॉलमुळे हिरावून गेल्या आहेत. शहरात किमान बंद पडलेल्या पाच प्रमुख मॉल्स आणि तेथील रिटेलर्सच्या शॉप्समुळे गेल्या दीड ते दोन वर्षांत दीड हजार युवक-युवती बेरोजगार झाले असून, त्यांना आता नव्या रोजगाराच्या संधी शोधाव्या लागत आहेत.
नाशिक शहर तसे पहिल्या शहरांच्या किंवा मेट्रो सीटीत नाहीच तरीही नाशिकचेच उद्योजक श्रीरंग सारडा यांनी कॉलेजरोडवर बिग बाजार सुरू केल्यानंतर नाशिकच्या रिटेल बाजाराचा नूरच बदलला. मग सुभिक्षा, स्पीनॅच, रिलायन्स फ्रेश अशा अनेक एकाहून एक मॉल्स सुरू झाले. सीटीसेंटर मॉल, पाठोपाठ कॉलेजरोडवरील श्रद्धा मॉल (भारती), त्र्यंबकरोड येथे सेंट्रल आणि पिनॅकल मॉल उभा राहिला. पाठोपाठ कालिका मंदिराजवळ केवळ रिलायन्स मॉल हा स्वतंत्र मॉलही उभा राहिला. एकापाठोपाठ एक उभ्या राहिलेल्या मॉल्समुळे स्पर्धा वाढली त्याचबरोबर रोजगारही वाढला. वेगवेगळ्या मॉल्समध्ये सेल्समन, सेल्सगर्ल्स, काउंटरबॉय, सुरक्षारक्षक, हमाली काम करणारे, पार्किंग सांभाळणारे अशा अनेक लहान-मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. वरिष्ठ पदावरही व्यवस्थापक, अकाउंटंट, स्टोअर किपर अशा पदांमुळे उदरनिर्वाहाचे साधन निर्माण झाले, परंतु त्यानंतर अचानक अनेक मॉल्स बंद करण्याचे निर्णय होत गेले. सुभिक्षा हा छोट्या रिटेलच्या शाखा बंद होत असताना स्पीनॅच आणि अन्य छोटे मॉल्स बंद झाले, परंतु सर्वाधिक मोठा फटका श्रद्धा मॉल (भारती रिटेलर्स) त्यानंतर पिनॅकल मॉल आणि त्यापाठोपाठ कालिका मंदिराजवळील रिलायन्स बंद पडल्याने मॉलमध्ये काम करणारे युवक-युवती मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले आहेत.
बहुतांशी मॉलमध्ये थेट भरतीऐवजी एजन्सीमार्फत मनुष्यबळ घेण्यात आले होते. काही ठिकाणी मॉल्सने स्वत: उमेदवारांची भरती केली होती. उमेदवारांचा अनुभव आणि अन्य पात्रतांचा विचार करून त्यांना वेतन दिले जात असले तरी एजन्सींनी पुरेसे वेतन न दिल्याच्या तक्रारी आहेत. अर्थात, दीड हजार युवक-युवतींनी सध्या अन्य ठिकाणी नोकऱ्या पत्करल्या असल्या तरी मॉलमध्ये काम करण्याचा चांगला अनुभव असल्याने अनेक युवक-युवती तेथे नोकरी मिळावी यासाठीच प्रयत्न करतात. नाशिकमध्ये नवीन मॉल्स येण्याची चाहुल लागली तरी अनुभवाच्या जोरावर उमेदवार नोकरीसाठी अर्ज करतात. शहरात नव्यानेच सुरू झालेल्या एका मॉल्सच्या शुभारंभाची वार्ता पोहोचता क्षणीच आठवडभरात शंभरहून अधिक अर्ज नोकरीसाठी आले आहेत.
मॉल्स सुरू होणे बंद पडणे हा त्यांच्या व्यवहारांचा किंवा त्यांच्या अडचणीचा भाग वेगळा असला तरी त्यातून मिळणारा रोजगार महत्त्वाचा आहे. त्यामुळेच बंद मॉलमुळे बंद पडणारा रोजगार हा विषय अधिक महत्त्वाचा ठरला आहे. (प्रतिनिधी)