अद्याप धागेदोरे हाती लागले नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:40 AM2019-04-01T01:40:51+5:302019-04-01T01:41:10+5:30
भरवस्तीत शहराच्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या कुलकर्णी गार्डनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीतील गजानन स्मृती अपार्टमेंटच्या वाहनतळात येऊन हल्लेखोरांनी एअर गनद्वारे गोळीबार करत तीन लाखांची लूट केल्याची घटना शनिवारी (दि.३०) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली होती.
नाशिक : भरवस्तीत शहराच्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या कुलकर्णी गार्डनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुलकर्णी कॉलनीतील गजानन स्मृती अपार्टमेंटच्या वाहनतळात येऊन हल्लेखोरांनी एअर गनद्वारे गोळीबार करत तीन लाखांची लूट केल्याची घटना शनिवारी (दि.३०) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांच्या हाती धागेदोरे लागलेले नसून पोलीस मागील २४ तासांपासून शोध घेत आहेत.
साधूवासवानी रस्त्यावरील गजानन स्मृती अपार्टमेंटच्या आठव्या क्रमांकाच्या सदनिकेत राहणारे विराग चंद्रकांत शाह (३८) हे गोळे कॉलनीमधील त्यांच्या पूनम एंटरप्रायजेस या होलसेल वैद्यकीय साहित्य विक्रीचे दुकान आटोपून दुचाकीवरून घरी आले. यावेळी त्यांचा पाठलाग करत एका स्पोर्टस बाइकवरून तिघे युवक अपार्टमेंटच्या वाहनतळापर्यंत आले. तिघांपैकी एकाने त्यांच्या दिशेने पिस्तूल (एअर गन) रोखून फायर केले. यामुळे शाह घाबरून वाहनतळातून जिन्याकडे पळताना जमिनीवर पडले. त्यांच्या हातातून दोघा हल्लेखोरांनी रोकड असलेली बॅग हिसकावून तत्काळ दुचाकीवरून पळ काढला. या घटनेला २४ तासांपेक्षा अधिक वेळ उलटला असून, अद्याप हल्लेखोरांचा सुगावा लागलेला नाही.
हल्लेखोरांच्या शोधार्थ सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या पथकांसह गुन्हे शाखेचे पोलिसांचे पथकही मागावर आहेत; मात्र अद्याप कुठल्याही पथकाला अशाप्रकारे जबरी लूट करणाऱ्या संशयितांविषयीची खात्रीशीर माहिती व धागेदोरे मिळून आलेले नाही. शहरासह जिल्ह्यात तसे जिल्ह्याबाहेरदेखील या हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.
मध्यरात्रीपर्यंत ‘मिशन’, दिवसभर चाचपणी
शनिवारी रात्री ८ वाजता घटना घडताच सर्वत्र सतर्कतेचे आदेश दिले गेले तसेच मध्यरात्री उशिरापर्यंत शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीती नाकाबंदी व मिशन आॅल आउट राबविण्यात आले. तसेच रविवारी दिवसभर सरकारवाडा पोलिसांकडून गंगापूररोड, साधूवासवानी रस्त्यावरील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासण्यात आले. तसेच सराईत संशयित गुन्हेगारांची चौकशी पोलिसांकडून याप्रकरणी केली गेली.