देवळाली रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी, निनावी पत्राने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 09:23 AM2019-02-18T09:23:25+5:302019-02-18T09:45:17+5:30
पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राद्वारे देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी रविवारी (17 फेब्रुवारी) देण्यात आली आहे. यानंतर पोलीस यंत्रणा व रेल्वे सुरक्षा पोलीस प्रशासन सतर्क झाले.
नाशिक : पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राद्वारे देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी रविवारी (17 फेब्रुवारी) देण्यात आली आहे. यानंतर पोलीस यंत्रणा व रेल्वे सुरक्षा पोलीस प्रशासन सतर्क झाले. तत्काळ बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून रेल्वे स्थानकाचा परिसर श्वानांच्या सहाय्याने तपासण्यात आला.
याबाबत अधिकृत सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आयुक्तालयाला निनावी पत्र प्राप्त झाले. त्या पत्रात दोन दिवसांमध्ये देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी पत्रात देण्यात आली होती. यानुसार आयुक्तालयाकडून तातडीने बॉम्बशोधक नाशक पथकाला आदेश देण्यात आले. रविवारी हे पथक देवळाली रेल्वे स्थानकात दुपारी दाखल झाले. तसेच रेल्वे सुरक्षा पोलिसांनाही याबाबत आयुक्तालयाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. पथकाकडून श्वानांमार्फत संपुर्ण परिसरात पिंजून काढण्यात आला. रेल्वे स्थानकावरील कचराकुंड्या, अडगळीच्या जागा धातुशोधक यंत्राद्वारे तपासण्यात आल्या. सुमारे तासाभरापेक्षा अधिक वेळ रेल्वे स्थानकाची तपासणी पथकाकडून सुरू होती; मात्र कोठेही कुठल्याहीप्रकारची आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नसल्याचा खुलासा सुत्रांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबत कुठलीही माहिती सैन्याला अधिकृतपणे मिळालेली नाही. देवळाली कॅम्प हा लष्करी छावनीचा परिसर असून याठिकाणी आर्टीलरी स्कूल हे भारतीय सैन्याचे अतिमहत्त्वाचे केंद्र आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली असून कुठल्याहीप्रकारे या पत्राकडे दुर्लक्ष न करता यंत्रणा सतर्क असून संपुर्ण रेल्वे स्थानकाचा परिसर पिंजून काढण्यात आला आहे. तसेच रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस यंत्रणेमार्फत सुरक्षाव्यवस्था वाढविली गेली आहे. जीआरपीचे पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, मांगुलाल पारधी, शरद सोनवणे, आरपीएफचे गोकुळ चौधरी यांच्यासह बॉम्बशोधक नाशक पथकाने तपासणी मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी रेल्वेचे सहाय्यक स्टेशन मास्तर मनोज सिन्हा यांच्यासह आदि अधिकारी उपस्थित होते.
पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क
धमकीचे निनावी पत्र जरी आयुक्तालयाला प्राप्त झाले असले तरीदेखील पुलावामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. यामुळे नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून देखील या पत्राची गंभीर दखल घेत तातडीने रेल्वे स्थानक परिसराची तपासणी बॉम्ब शोधक-नाशक पथकामार्फत रविवारी करण्यात आली. तसेच रेल्वे पोलिसांनाही सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
आंतरदेशीय पोस्टकार्ड द्वारे दोन ओळीचा मजकूर असलेले पत्र आयुक्तालायला प्राप्त झाले. त्यानंतर खबरदारी म्हणून रेल्वे स्थानक बॉम्ब शोधक नाशक पथकाने तपासले. कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवू नये.
- रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नाशिक