‘मान्सून स्कूटर रॅली’चा थरार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 09:55 PM2018-08-25T21:55:28+5:302018-08-25T21:59:26+5:30
स्पोर्ट्सक्राफ्ट व नाशिक आॅटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित २९वी मान्सून स्कूटर रॅली नाशिकमध्ये शनिवारी (दि. २५) चांगलीच रंगली. ही रॅली बघण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी झाली होती.
नाशिक : शहरातील विल्होळी शिवारातील सारूळ गावामधील अत्यंत खडतर, चिखलमय अन् खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या मार्गावरून ‘मान्सून स्कूटर रॅली’चा थरार पहावयास मिळाला. या रॅलीचे जेतेपद ‘एप्रिला’ संघाचा मुंबईचा स्कूटरचालक व्यंकटेश शेट्टीने पटकाविले, तर याच संघाचा झिशान सय्यद हा उपविजेता ठरला. मागील रॅलीचे विजेतेपदही शेट्टीने राखले होते.
स्पोर्ट्सक्राफ्ट व नाशिक आॅटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित २९वी मान्सून स्कूटर रॅली नाशिकमध्ये शनिवारी (दि. २५) चांगलीच रंगली. ही रॅली बघण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी झाली होती. स्पर्धेत नामवंत व आघाडीचे दुचाकीचालक सहभागी झाले होते. यामध्ये मनजितसिंग बासन, शमीम खान, मुझफ्फर अली, सय्यद आसिफ अली यांचा समावेश होता. तसेच अमृता गुरुजी आणि प्रियांका गीत या महिला दुचाकीचालकांचा सहभाग लक्षवेधी ठरला.
चालकांसाठी अत्यंत कठीण असलेली ही स्पर्धा धाडस व कौशल्याचा आत्मविश्वासपूर्ण खेळ असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. चिखलमय रस्ता अन् वाटेत खड्डे, तीव्र वळण, चढ-उतार अशा मार्गावरून सारूळ शिवारात रंगली. यावेळी सहभागी दुचाकीचालक स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी चुरस पहावयास मिळाली. पाच किलोमीटरची रॅली शेट्टीने १९ मिनिटे, १३ सेकंदात पूर्ण केली. अत्यंत जलद वेळेमध्ये रॅलीचे अंतर कापणारा तो एकमेव रायडर ठरल्याने गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही शेट्टी चॅम्पियन ठरला. सय्यद याने द्वितीय क्रमांक राखला तर सय्यद आसिफ अली याने तिसरा क्रमांक मिळविला. अवतार सिंग व मुझफ्फर अली हे स्पर्धकही पहिल्या पाच विजेत्यांच्या यादीत झळकले. ही स्पर्धा मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती; मात्र अखेरच्या क्षणी नाशिकमध्ये स्पर्धा पार पाडण्याचा निर्णय घेतला गेला. मुंबई, पुणे, भोपाळ, वडोदरा, रायगड, पनवेल व नाशिक येथून एकूण ४१ रायडर्स सहभागी झाले होते. तसेच एप्रिला व टीव्हीएसच्या संघांनीही स्पर्धेत सहभाग घेतला.
शेट्टी यास चषक व दहा हजार रुपये रोख आणि स्कूटरचे टायर असे पारितोषिक देण्यात आले. तसेच सय्यद यास साडेसात हजार रुपये रोख, चषक प्रदान करण्यात आला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व चषक प्रदान करण्यात आला. यावेळी श्रीकांत करानी, संजय शर्मा, बी. सेल्वराज आदी उपस्थित होते. ‘एप्रिला’चा पिंकेस ठक्कर याला अधिक पसंतीचे मानले जात होते, पण काही अपरिहार्य कारणास्तव रॅलीमध्ये सहभागी होऊ शकला नाही.