'संसरी'मध्ये थरार : दरोडेखोरांसोबत पती-पत्नीची झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 02:00 PM2018-02-26T14:00:07+5:302018-02-26T14:00:07+5:30
झटापटीत दरोडेखोरांनी कोयत्याने वार केल्यामुळे गोकूळ गोडसे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला तर त्यांच्या पत्नीवर हल्ला चढविल्याने त्यादेखील जखमी झाल्या.
नाशिक : मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या संसरी गावातील मोदकेश्वर अपार्टमेंटमध्ये दरोड्याच्या उद्देशाने दाखल झालेल्या दोघा दरोडेखोरांना प्रतिकार करत पती-पत्नीने झुंज दिली; मात्र यात त्यांना अपयश आले दोघे दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. झटापटीत दरोडेखोरांनी कोयत्याने वार केल्यामुळे गोकूळ गोडसे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला तर त्यांच्या पत्नीवर हल्ला चढविल्याने त्यादेखील जखमी झाल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संसरी गावात मोदकेश्वर अपार्टमेंट असून या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये दरोडेखोर असल्याचे गोडसे यांना पाय-या चढताना लक्षात आले. त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत दरोडेखोरांचा प्रतिकार केला. यावेळी दोघा दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाल केली. झालेल्या झटापटीत गोडसे यांनी दरोडेखोराला पकडण्यास यश मिळविले; मात्र त्याच्या दुस-या साथीदाराने कोयत्याने त्यांच्यावर वार केल्याने ते पाय-यांवर कोसळले. यावेळी त्यांच्या आवाजाने घरातून त्यांची पत्नी धावत बाहेर आली असता, दरोडेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोडसे यांनी त्यांना रोखले असता दरोडेखोरांनी त्यांच्या पत्नीला ढक लून दिले व पळ काढण्याचा प्रयत्न केला. पाय-या उतरत असताना आवाजाने शेजारी राहणारा गोडसे यांचा पुतण्या अमितहा देखील बाहेर आला व त्याने हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र हल्लेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून झटापट करत सुटका करुन घेतली. यावेळी हल्लेखोरांचा मोबाईल, चष्मा, जॅकेट घटनास्थळी पडले. या साहित्यांच्या आधारे घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. अपार्टमेंटमध्ये घुसून दरोडा टाकण्याच्या या घटनेने संपूर्ण देवळाली कॅम्प, संसरी गाव परिसरात दहशत पसरली आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्तीविषयीदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
--
लष्करी छावणी असलेल्या देवळाली कॅम्प परिसरत सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. देवळाली येथे तोफखाना केंद्र, हवाई दलाचे मुख्यालय यांच्या लष्करी छावण्या आहेत. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेची मोठी जबाबदारी देवळाली कॅम्प पोलिसांवर आहे. रात्री तसेच दिवसाही पोलिसांनी डोळ्यात तेल घालून गस्त घालण्याची मागणी होत आहे.