जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या तिघांची उच्च न्यायालयात निर्दोष मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:30+5:302021-07-18T04:11:30+5:30
नाशिक रोड येथे २८ मार्च २०१७ रोजी कृष्णा नागे याच्या खूनप्रकरणी पवन बोरसे, अंकुश नाठे व आणखी एक संशयित ...
नाशिक रोड येथे २८ मार्च २०१७ रोजी कृष्णा नागे याच्या खूनप्रकरणी पवन बोरसे, अंकुश नाठे व आणखी एक संशयित आरोपीविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तिघा आरोपींना एप्रिल २०१८ मध्ये नाशिकच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्या शिक्षेविरुद्ध आरोपींच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपिलाची सुनावणी न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या समोर होऊन ॲड. अनिकेत निकम यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली. त्यावेळी आरोपींच्या विरोधात असलेला पुरावा हा परिस्थितीजन्य पुरावा असून, तपास यंत्रणेने गोळा केलेल्या पुराव्यांची साखळी ही सकृतदर्शनी सदरच्या आरोपीने गुन्हा केला आहे, असे सिद्ध करत नाही. कृष्णा नागे याचा मृत्यू दुर्दैवी होता; परंतु आरोपी व कृष्णा नागे यांच्यामध्ये कुठलेही वैमनस्य नव्हते व त्याला मारण्याचा कुठलाही हेतू आरोपींकडे नव्हता, असा युक्तिवाद निकम यांनी केला. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या साखळीमुळे आरोपी नाठे व बोरसे यांनी कट कारस्थान करून खून केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरविता येत नसल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने आरोपींच्या विरुद्ध सादर केलेली पुराव्यांची साखळी सिद्ध होत नसल्याचे मान्य केले व तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपी पवन बोरसे आणि अंकुश नाठे हे मार्च २०१७ पासून नाशिक कारागृहात शिक्षा भोगत आहेत.