इगतपुरीत आढळले तीन बाधित; भाजी मार्केट परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 07:12 PM2020-06-25T19:12:53+5:302020-06-25T19:14:10+5:30
नांदूरवैद्य : इगतपूरी शहरातील नागरिकांची वर्दळ असलेल्या परिसरात पुन्हा तीन रुग्ण बाधित आढळल्याने भीती व्यक्त होत आहे. शहरातील लोया रोड तसेच भाजी मार्केट परिसर सील करण्यात आला असून प्रशासनातर्फे दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इगतपुरी तालुक्यातील रुग्णसंख्या ४२ झाली असून त्यात ग्रामीण भागातील १९ तर शहरातील २३ रुग्णांचा समावेश आहे.
गुरूवारी (दि. २५) भाजी मार्केट परिसरातील चिरंजीवी बावडीजवळील एका इमारतीत ५८वर्षीय पुरु ष तसेच ३५आणि २० वर्षीय दोन महिला अशा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिक व प्रशासनासाठी ही चिंतेची बाब मानली जात आहे. त्यामुळे कोकणी मस्जिद ते भाजी मार्केट परिसर १४ दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. इगतपुरी येथे एका ६७ वर्षीय व्यक्तीचे मागील आठवड्यात निधन झाले होते. त्या व्यक्तीचा बुधवारी प्राप्त झालेला अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्तीचे इगतपुरी येथील लोया रोडवर मेडिकल दुकान आहे. त्यामुळे शहरातील अत्यंत वर्दळीचा असलेला पटेल चौक व संपूर्ण लोया रोड सील करण्यात आला असून प्रशासनातर्फे आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. अशा स्थितीत नागरिकांनी गांभीर्य सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन इगतपुरी तहसीलदार परमेश्वर कासुळे, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एम. देशमुख, पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी केले आहे.