साडेतीन लाखांचे दागिणे लंपास : लग्नसराई अन् सुटीचा हंगाम ठरतोय पर्वणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 07:35 PM2019-05-07T19:35:20+5:302019-05-07T19:37:51+5:30
ज्येष्ठ नागरिक बाविस्कर हे ४ तारखेला बाहेरगावी गेले होते. दोन दिवस त्यांचा बंगला कुलूपबंद होता. या दरम्यान, चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीत चोऱ्या, घरफोड्या, सोनसाखळी हिसकावणे, विनयभंग यांसारखे गुन्हे सातत्याने घडत आहेत. गंगापूर रोडवरील दातेनगर भागात एका बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सध्या उन्हाळी सुटी, लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने चोरटे डाव साधत ‘रेकी’ करून बंद घरांना लक्ष्य करत असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वसंत श्रावण बाविस्कर (६८, रा. ऋतुराज बंगला) यांनी या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्येष्ठ नागरिक बाविस्कर हे ४ तारखेला बाहेरगावी गेले होते. दोन दिवस त्यांचा बंगला कुलूपबंद होता. या दरम्यान, चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममध्ये असलेले कपाट उघडून १ लाख ६० हजार रुपयांच्या आठ तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या, १ लाख २० हजार रुपये किमतीचे सहा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ४० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, १५ हजार रुपयांचे सोन्याचे कानातील आभूषणांचे पंधरा नग, १५ हजारांची रोकड असा सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लुटून पोबारा केला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक एस. आर. साबळे करीत आहेत. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीमध्ये वाढ होत असून, शहरातील उच्चभ्रू वसाहतीचा परिसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट असून, या भागात पोलीस गस्त थंडावल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत विविध शाळा-महाविद्यालये, हॉटेल्स, रेस्टॉरंट, रुग्णालये, शॉपिंग मॉलची संख्या आहे. तसेच उच्चभ्र नागरिकांचे बंगले, रो-हाउस, अपार्टमेंट असून, या भागात चोरट्यांनी वक्रदृष्टी केली अहे.