शाब्बास पोरी! साडेतीन वर्षांच्या चिमुकलीने केली कमाल; सर केले 'कळसूबाई'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 12:56 PM2021-11-17T12:56:40+5:302021-11-17T13:04:59+5:30
कळसूबाई शिखराचे आकर्षण लहान-मोठ्यांना नेहमीच राहिले आहे. हे पर्वत सर करण्यासाठी तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण उत्सुक असतात. अशाच उत्सुकतेपोटी ...
कळसूबाई शिखराचे आकर्षण लहान-मोठ्यांना नेहमीच राहिले आहे. हे पर्वत सर करण्यासाठी तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण उत्सुक असतात. अशाच उत्सुकतेपोटी आणि कुतूहलातून इंदिरानगर येथील या चिमुकलीनेही कळसूबाईचा शिखरमाथा गाठला. गिरीभ्रमंती करणारे हौशी ट्रेकर्स पंकज घुगे हे नियमितपणे ट्रेकिंगसाठी जातात. त्यामुळे आपल्या वडिलांपासून प्रोत्साहित होत प्रीषाने आपल्या आई-वडिलांकडे हट्ट धरला.
समुद्रसपाटीपासून सुमारे १ हजार ६४६ मीटर (५ हजार ४०० फूट) उंची असलेल्या कळसूबाई शिखराच्या चढाईला बारी गावातून रविवारी (दि.१४) तिने आपल्या आई-वडिलांसह सुरुवात केली. प्रीषाने अगदी हसत- खेळत ‘जल्लोष ट्रेकिंग ग्रुपच्या साथीने कळसूबाई पर्वताचा माथा अवघ्या साडेतीन तासांत गाठला. यानंतर कळसूआई मंदिराजवळ प्रीषाने विश्रांती घेत तिरंगा ध्वज हातात घेत सर्वांना सुदृढ आरोग्यासाठी निरामय जीवनशैलीचा स्वीकार करावा, असा सामाजिक आरोग्यपुर्ण संदेश दिला. कळसूबाई शिखर सर करताना आजूबाजूच्या निसर्गसौंदर्यासह विविध पक्ष्यांचे दर्शन घडल्याने प्रीषाने आनंद व्यक्त केला.