चार गावठी कट्यांसह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:05+5:302021-05-29T04:13:05+5:30
सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथे विनापरवाना गावठी कट्टा बाळगणाऱ्या तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी सापळा रचून अटक ...
सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथे विनापरवाना गावठी कट्टा बाळगणाऱ्या तिघा संशयितांना अंबड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. हे तिघेही चुंचाळे शिवारातील रहिवासी असून, त्यांच्याकडून चार गावठी कट्टे हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले. एक्स्लो पॉइंट येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयितांकडे गावठी कट्टे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई करीत पोलिसांनी आकाश सिंग बिपिन सिंग याच्याकडून दोन, रोहित मस्के व एरिक कुतूर (तिघे रा,. चुंचाळे, अंबड ) यांच्याकडून दोन असे एकूण चार गावठी कट्टे हस्तगत केले.
अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या सूचनेनुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे व त्यांच्या पथकाने रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अंबड येथील एक्स्लो पॉइंट येथे सापळा रचला. यावेळी तिघेही संशयित संशयास्पदरीत्या वावरताना पोलिसांना दिसून आले. या तिघांना पोलिसांनी हटकले व त्यांची चौकशी करून झडती घेतली असता केली असता त्यांच्याकडे चार गावठी कट्टे आढळून आले. या कारवाईत गणेश शिंदे यांच्यासह उत्तम सोनवणे, हेमंत आहेर, रफिक शेख ,राकेश राऊत मुरली जाधव आदी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
दरम्यान, अटक केलेल्या तिघाही संशितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.