ट्रकमधून उतरविलेले लोखंडी बार विकणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 01:57 AM2022-05-14T01:57:52+5:302022-05-14T01:58:14+5:30
नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी शिव येथील सीएनजी पंपाजवळ ट्रकमधून उतरविलेले लोखंडाचे बार, सळई चोरट्या पद्धतीने विकणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ट्रकसह २४ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
नाशिक रोड : नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी शिव येथील सीएनजी पंपाजवळ ट्रकमधून उतरविलेले लोखंडाचे बार, सळई चोरट्या पद्धतीने विकणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ट्रकसह २४ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी शिव येथील सीएनजी पंपाशेजारी पत्र्याच्या दुकानासमोर एक ट्रक संशयास्पदरीत्या उभा आहे. त्यात सिन्नर येथील भगवती स्टील व जालना जिल्ह्यातून ट्रकमधून येणारा लोखंडी सळई व बारचा माल उतरवून घेतला जातो. तो माल त्या पत्र्याच्या शेडसमोरील ट्रकमध्ये जमा करण्यात आला असून, तो चोरट्या पद्धतीने विकला जात आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून संशयित नितीन रमेश ढेरिंगे (पळसे), विनोद बळीराम मोरे (सोमवार बाजार, देवळाली गाव), सुनील दामू ताजनपुरे (चेहेडी मारुती मंदिराजवळ) या तिघांना पकडले. त्या ठिकाणी मिनी ट्रक(एमएच १५ एफयू ३०३०)मध्ये साडेतीन लाखाच्या पाच टनाचे नवीन बांधकामासाठी लागणारे बार, त्यानंतर २० फूट लांबीच्या दहा लोखंडी पट्ट्या, सळई कापण्याची मशीन, १५ फूट उंच व दीड फूट लांबीची सळई उतरविण्यासाठी लागणारी ५० हजाराची शिडी व २० लाखाचा ट्रक असा २४ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.