१२ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या तिघांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 01:05 AM2021-07-02T01:05:12+5:302021-07-02T01:06:18+5:30
कॉलेज रोडवरील येवलेकर मळ्यात घरफोडी करून रोकड व दागिने चोरणाऱ्या टोळीस गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तिघा संशयित चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून घरफोडीतील मुद्देमाल जप्त केला आहे. गोविंद सुभाष निसाळ (वय १९, रा. वाघाडी), सुधीर ऊर्फ पंकज भानुदास मोहिते (३२, रा. मोरेमळा, पंचवटी), रोशन अशोक निसाळ (१९, रा. मिलिंदनगर) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.
नाशिक : कॉलेज रोडवरील येवलेकर मळ्यात घरफोडी करून रोकड व दागिने चोरणाऱ्या टोळीस गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तिघा संशयित चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून घरफोडीतील मुद्देमाल जप्त केला आहे. गोविंद सुभाष निसाळ (वय १९, रा. वाघाडी), सुधीर ऊर्फ पंकज भानुदास मोहिते (३२, रा. मोरेमळा, पंचवटी), रोशन अशोक निसाळ (१९, रा. मिलिंदनगर) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून २२ लाख ७२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. येवलेकर मळा परिसरात संजय दशपुते यांच्या घरात २४ ते २५ जून दरम्यान घरफोडी करून चोरट्यांनी १० लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण १२ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा गुन्हे शाखेकडून समांतर तपास केला जात होता.
गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक प्रवीण वाघमारे यांना एका चोरट्याची गोपनीय माहिती मिळाली. संशयित गोविंद निसाळ हा गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करीत असल्याचे त्यांना समजले. वाघमारे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना माहिती दिली. तत्काळ सहायक निरीक्षक रघुनाथ शेगर, महेश कुलकर्णी, दिनेश खैरनार, उपनिरीक्षक विष्णू उगले, काशिनाथ बेंडकुळे, रवींद्र बागुल, वसंत पांडव यांच्या पथकाकडून सापळा रचला गेला. त्याला शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी उर्वरित दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्रिकुटाकडून १२ लाख ९० हजार रुपयांच्या रोकडसह ९ लाख ५७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, आठ हजार रुपये किमतीचा ऐवज व ३५ हजार रुपयांची दुचाकी असा एकूण २२ लाख ७२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.