तिघांना अटक : मालेगावच्या पवारवाडी पोलिसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2016 10:52 PM2016-02-19T22:52:01+5:302016-02-19T22:52:26+5:30
वेगवेगळ्या गुन्ह्यातील १६ लाखांचा माल हस्तगत
आझादनगर : मालेगाव येथील पवारवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुरुवारी (दि.१८) रात्री चार वेगवेगळ्या गुन्ह्यात दोन पिकअप, दोन ट्रकसह एकूण १६ लाख ४६ हजार ८०० रुपयांचा माल हस्तगत केला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीतील देवीचा मळा येथे ११ फेब्रुवारी रोजी रात्री सुताच्या गुदामाचे मागील दाराची कडी तोडून गुदामातील सुताचे ७४ थैल्या चोरीस गेल्या होत्या. याबाबत मोहंमद ताहीर जैनुलआबदीन यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अरुण पगारे, हवालदार विनय देवरे, दीपक काकडे, प्रसाद राडे व पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, हवालदार बावीस्कर, पोलीस कर्मचारी बत्तीसे, दीपक गांगुर्डे, सचिन भामरे, सय्यद यांच्या संयुक्त पथकाने संशयितांचा कसोशीने शोध घेतला. यात गुरुवारी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शेख मोहंमद शेख मेहबूब (२२) यास ताब्यात घेण्यात आले. शेख मेहमुद याने दिलेल्या माहितीनुसार शेख हारुण शेख निसार (२३), शेख आदिल शेख कलीम, रा. मालेगाव यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा सुताचे थैल्या हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गढरी करीत आहेत, तर दुसऱ्या घटनेत शुक्रवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास नुरानीनगर येथे पोलीस गस्तीवर असताना भरधाव असणाऱ्या ट्रकचा (एमएच.१८- अे. अे. ८८८०) संशय आल्याने पोलिसांनी ट्रक थांबवून वाहनाची तपासणी केली असता ट्रकमध्ये आठ ब्रास वाळू असल्याचे आढळून आले. बेकायदेशीर वाळू चोरी प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाणे गुरन २५/२६ भादवि ३७९, ३४ व गौण खनिज अधिनियम नुसार तलाठी प्रकाश सुधाकर पवार यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी युनूस खान हनिफ खान पठाण, रा. धुळे व सचिन प्रल्हाद रायदे, रा. सोयगाव, मालेगाव यांच्या
विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक व ४० हजार रुपये किमतीची वाळू असा ५ लाख ४० हजार रुपयांचा माल ताब्यात घेतला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी. आर. जारवाल करीत आहेत. (प्रतिनिधी)