दगडफेकप्रकरणी तीघे ताब्यात; दोन दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 08:12 PM2020-05-11T20:12:11+5:302020-05-11T20:13:01+5:30
नाशिक : जुने नाशिक परिसरातील आझाद चौकात लॉकडाउनमध्ये रविवारी (दि.९) रात्री आठ वाजेच्या सुमारास दगडफेक व वाहनांची तोडफोड करत ...
नाशिक : जुने नाशिक परिसरातील आझाद चौकात लॉकडाउनमध्ये रविवारी (दि.९) रात्री आठ वाजेच्या सुमारास दगडफेक व वाहनांची तोडफोड करत दहशत पसरविण्याची घटना घडली होता. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी तीघा संशयितांना अटक केली आहे. अन्य आठ दंगलखोर अद्याप फरार असून त्यांची ओळख पटली असून लवकरच त्यांनाही बेड्या ठोकल्या जातील असे पोलिसांनी सांगितले.
जुन्या नाशकातील चव्हाटा येथील आझाद चौकात काजीपुरा, तपोवन, द्वारका, पंचवटी या भागातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळके समोरासमोर आले. त्यांनी स्वत: जवळ बाळगलेले पिस्तुल, गुप्ती, कोयत्यासारखी घातक शस्त्रे काढत एकमेकांना धमकावत दंगल माजविण्याचा प्रयत्न केला. तसेच एकमेकांच्या दिशेने दगडफेकदेखील केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही; मात्र डझनभर युवकांनी एकत्र येत घातलेल्या धुमाकुळमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे, पोलीस निरिक्षक दत्ता पवार, सहायक निरिक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरिक्षक जितेंद्र माळी हे पोलीस फ ौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत दंगलखोर टोळके घटनास्थळावरून फरार झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून काही तासांतच या गुन्ह्यातील सहभागी संशयित अनंत राजेंद्र पाटील (१९, रा.अमरधाम), दिपांशु राजेंद्र आव्हाड (२०,रा.कृष्णापार्क, तपोवन), गौतम संतोष रंजवे (१९,रा.मातंगवाडा, द्वारका) या तीघांना अटक केली आहे. यांना जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने पुढील दोन दिवस त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
या गुन्ह्यात आकाश भाग्यवंत (रा.जेजुरकरमळा, तपोवन), राहूल गुप्ता (रा.शनि चौक, पंचवटी), धनंजय गायकवाड व त्याचे साथीदार राजु वाघमारे, अक्षय कानडे (रा.आझाद चौक, भद्रकाली), सोनू, आकाश यांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून जमावबंदी, संचारबंदीसह आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केले. या सर्व टोळक्याविरूध्द विविध कलमांन्वये भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तीघा संशयितांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल, गुप्ती, कोयता हे घातक शस्त्रे जप्त केले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.