लाचेची रक्कम घेताना वनपालासह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 01:44 AM2021-05-20T01:44:50+5:302021-05-20T01:45:15+5:30
पूर्व वनविभागाच्या वणी वनपरिक्षेत्रातील वन परिमंडळ कार्यालयात वनपाल आणि दोन वनरक्षकांना लाचेची ५० हजारांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ ताब्यात घेतले.
नाशिक : पूर्व वनविभागाच्या वणी वनपरिक्षेत्रातील वन परिमंडळ कार्यालयात वनपाल आणि दोन वनरक्षकांना लाचेची ५० हजारांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ ताब्यात घेतले.
वणी जवळील चिंचखेड गावातील शेतजमिनीच्या बाजूस असलेल्या एका वनक्षेत्रातून खोदलेल्या चरावरून पाण्याची पाईपलाईन शेतीपर्यंत टाकण्याच्या कामाला परवानगी मिळावी, याकरिता तक्रारदाराने वनाधिकारी यांच्याकडे विनंती केली होती. दरम्यान, वनाधिकारी, कर्मचारी यांनी त्याच्याकडून १ लाख रुपयांची मागणी केली. यावरून तक्रारदार आणि या वन कर्मचाऱ्यांमध्ये तडजोड होऊन ५० हजारांची रक्कम देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला. यानुसार पथकाने खात्री करीत पंचांसमक्ष पडताळणी केली आणि सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ५० हजारांची रक्कम देण्यासाठी तक्रारदार शेतकरी हे वणी येथील वन परिमंडळ कार्यालयात आले असता त्यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना वनपाल अनिल चंद्रभान दळवी (५०, रा-विंचूर दळवी, ता. सिन्नर), वनरक्षक उस्मान गणीमलंग सय्यद (४९, रा. फॉरेस्ट कॉलनी वणी) आणि सुरेखा अश्रुबा खजे (रा. संस्कृतीनगर,वणी) यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वणी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांनाही या गुन्ह्याच्या कारवाईची प्रत सादर केली आहे.