...या तर चोराच्या उलट्या बोंबा; राऊतांवर हल्लाबोल, भाजपचे तीनही आमदार आक्रमक
By Suyog.joshi | Published: October 20, 2023 07:22 PM2023-10-20T19:22:58+5:302023-10-20T19:23:18+5:30
ललित पाटील याला आम्ही जावई म्हणून सोडलेला नाही तर पकडलेला आहे असे फरांदे यांनी सांगितले.
नाशिक: शिवसेना नेते संजय राऊत हे मनोरूग्ण असून त्यांची नार्को टेस्ट करा असे सांगत राऊतांचे आरोप म्हणजे या तर चोराच्या उलट्या बोंबा असा प्रतिहल्ला शहरातील तीनही भाजपच्या आमदारांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे व राहुल ढिकले यांनी राऊत यांच्या तोफ डागली. यावेळी फरांदे म्हणाल्या, ललित पाटील शिवसेनेचा पदाधिकारी आहे. संजय राऊत सकाळी उठून बोलतात, एक तर संजय राऊत हे मनोरुग्ण आहेत नाही तर ते अमली पदार्थांचे सेवन करत असतील. त्यांची नार्को टेस्ट करावी. मुंबई पोलिसांनी नाशकात येऊन कारखाना उध्वस्त केला, सोलापूरला कारखाना उध्वस्त केला आणि ललित पाटील याला अटक केल्यानंतर ठाकरे गटाने नाशिकला मोर्चा काढला? ललित पाटील याला अटक केली तेव्हा मोर्चा का काढला नाही असा प्रश्न फरांदे यांनी उपस्थित केला.
ललित पाटील प्रकरणी आम्ही नेहमी विधानसभेत गृहमंत्र्यांशी चर्चा केली. गृहखाते त्याबाबत कारवाई करत आहे. शिवसेनेला जाणारा हप्ता बंद झाल्यानेच आजचा मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप करत फरांदे यांनी सांगितले की, उबाठा शिवसेनेने ड्रग्जप्रकरणी राजकारण थांबवावे. अभिनेता सुशांतसिंह राजपुत प्रकरणातही ड्रग्ज रॅकेट दाबले गेले. त्याला दोषी कोण? असा प्रतिप्रश्न फरांदे यांनी उपस्थित केला. राऊत यांनी जर पुरावे असतील तर सादर करावे असे फरांदे यांनी सांगत ड्रग माफियावर मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी कधीही कारवाई केली नाही असा आरोप केला. उध्दव ठाकरे यांच्या काळात व्यापाऱ्यांचे अपहरहण केलं जातं होत आणि खून केला आणि इथे येऊन जर तुम्ही नाकाने कांदे सोलत असाल तर हे दुर्दैव आहे.
आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही पोलिसांना देऊ. शहराला ड्रग मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून या विषयात जर सरकारी अधिकारी चालढकल करत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल असेल प्रकार खपवून घेणार नाही. यावेळी मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, विजय साने आदी उपस्थित हाेते.
....तर अब्रूुनुकसानीचा दावा ठोकणार
उबाठा सेनेतर्फे ड्रग्जप्रकरणात राजकारण केले जात आहे. गुंडांना पक्षात घेऊन नाचणारा आमचा पक्ष नाही. आमच्यावर नाव घेऊन आरोप केल्यास अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असा इशारा अमादार राहुल ढिकले यांनी दिला. ड्रग तसेच रोलेट गेम विरोधात आम्ही कायम आवाज उठवलेला आहे. ललित पाटील याला आम्ही जावई म्हणून सोडलेला नाही तर पकडलेला आहे असे फरांदे यांनी सांगितले.