तीन पुलांचे आॅडिट तीन वर्षांपासून प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:54 AM2019-03-16T01:54:19+5:302019-03-16T01:54:27+5:30
नाशिक : ब्रिटिशांनी बांधलेल्या त्यावेळेच्या व्हिक्टोरिया आणि आताच्या होळकर पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा म्हणजे काही वर्षांपूर्वी ब्रिटिश ...
नाशिक : ब्रिटिशांनी बांधलेल्या त्यावेळेच्या व्हिक्टोरिया आणि आताच्या होळकर पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा म्हणजे काही वर्षांपूर्वी ब्रिटिश कंपनीने आयुर्मान संपले, असे महापालिकेला कळवून आता वीस वर्षे झाली. परंतु सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर जवळपास तीन वर्षे झाली. परंतु महापालिका क्षेत्रातील तीन ब्रिटिश कालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट तीन वर्षांत पूर्ण होऊ शकले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोन ते अडीच वर्षे फाइली फिरल्यानंतर आता जानेवारी महिन्यात एका कंपनीला तीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले, परंतु हे कामदेखील तीन महिन्यांत पूर्ण झाले नसून अद्यापही महापालिकेला अहवाल अप्राप्त आहे.
गुरुवारी (दि.१४) सीएसटी येथील पादचारी पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी सावित्री नदीवरील पूल कोसळण्याची दुर्घटना साताऱ्याजवळ घडली होती. अशी दुर्घटना घडली की राज्यभरात तपासणी आणि सतर्कतचे आदेश दिले जातात. परंतु त्यानंतर मात्र गांभीर्य नष्ट होते. नाशिक महापालिकेत पुलांच्या स्ट्रक्चरल आॅडिटची फाइल डॉ. प्रवीण गेडाम आणि त्यानंतर अभिषेक कृष्ण यांच्या कालावधीत सुरू झाली. तुकाराम मुंढे यांच्या आयुक्तपदाच्या कालावधीत तर ही फाइल अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आली. मुंढे यांची बदली आणि तत्कालीन शहर अभियंत्यांची निवृत्ती यांनतर विद्यमान शहर अभियंता संजय घुगे यांनी जुन्याच ठेकेदाराला त्याच दरामध्ये तीन पुलांचे काम करून देण्यास सांगितले. संबंधित ठेकदारदेखील तयार झाल्यानंतर जानेवारी महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यात आले आणि संबंधित एजन्सीला अहिल्यादेवी होळकर पूल तसेच आडगाव येथील गावाला जोडणारा पूल आणि नाशिकरोड
विभागातील वालदेवी नदीला जोडणार पूल असे तीन ब्रिटिश कालीन पूल आहेत, परंतु या तीन पुलांचे आॅडिट १५ मार्चपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे महापालिकेने तातडीने अहवाल मागवला आहे. ज्या तीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश होते ते ब्रिटिश कालीन म्हणजेच शंभर वर्षांपूर्वीचे आहेत. त्यातील नाशिक आणि पंचवटीला जोडणारा गोदावरी नदीवरील ब्रिटिश कालीन व्हिक्टोरिया पूल आता नाशिककरांना अहिल्यादेवी होळकर नावाने परिचित असून, तो ब्रिटिशांनी १८९५ साली बांधला. त्याचे शंभर वर्षांचे आयुर्मान संपल्यानंतर १९९७-९८ साली ब्रिटिश कंपनीने न विसरता नाशिकच्या जिल्हा प्रशासनाला पत्र पाठविले आणि या पुलाचे आयुर्मान संपल्याचे कळवले. शंभर वर्षानंतरही कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग म्हणून ब्रिटिश कालीन कंपनीने जिल्हा प्रशासनाला न चुकता कळवले. तेथे मात्र राज्य शासनाचे आदेश प्राप्त होऊनही महापालिकेने अद्याप आॅडिट पूर्ण केलेले नाही हे विशेष होय. एकीकडे नाशिकची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना म्हणजे द्रुतगतीने विकास अपेक्षित केला जात आहे.
तिन्ही पुल ब्रिटिश कालीन
महापालिकेने अहिल्यादेवी होळकर पुलाचे आॅडिट करण्यास सांगितले आहे, सदरचा पूल १२४ वर्षांचा आहे. त्याचे आॅडिट अद्याप झालेले नाही. मात्र महापालिकेने त्याला समांतर जिजामाता पूल बांधला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर महापालिकेच्या हद्दीलगत आडगाव असून, गावात प्रवेशासाठी असलेला पूलदेखील ब्रिटिश कालीन असून, त्याची दुरवस्था झाली आहे. स्ट्रक्चरल आॅडिट होण्याच्या आतच महापालिकेने चालू अंदाजपत्रकात त्याठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी तरतूद केली आहे.
वालदेवी नदीवरील पूल हा अत्यंत जुना असून, तोदेखील ब्रिटिश कालीन असल्याने महापालिकेने त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट होण्याच्या आतच समांतर पूलदेखील केला आहे.