तीन उमेदवारांच्या प्रकाशकांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:02 AM2019-10-17T01:02:57+5:302019-10-17T01:04:01+5:30
प्रचारपत्रकावर प्रकाशक आणि मुद्रकाचा पत्ता प्रसिद्ध न केल्याने नाशिक पश्चिममधील भाजप, कॉँग्रेस आणि मनसे उमेदवारांच्या प्रकाशकांवर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : प्रचारपत्रकावर प्रकाशक आणि मुद्रकाचा पत्ता प्रसिद्ध न केल्याने नाशिक पश्चिममधील भाजप, कॉँग्रेस आणि मनसे उमेदवारांच्या प्रकाशकांवर आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक मध्य मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष, कॉँगे्रस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या तीनही उमेदवारांच्या विरोधात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सातपूर, गंगापूर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. देवयानी फरांदे यांच्या जाहिरात पत्रकावर संबंधित प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे आहेत. मात्र त्यांचे पत्ते नमूद नसल्याने प्रकाश प्रशांत जाधव, पवन भगूरकर, नाना शिलेदार, सुरेश मानकर, सुनील देसाई, श्याम बोरदे, राम काळे, देवदत्त शिंदे, उदयरत्न पारखी, वसंत उशीर, अविनाश पाटील, रोहिणी नायडू, भारती बागुल, पुष्पा शर्मा, सुजाता करजगीकर, अजिंक्य साने यांच्यावर सातपूरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमलता पाटील यांच्या जाहिरात पत्रकातदेखील मुद्रकाचे नाव व पत्ता तसेच प्रकाशकाचा पत्ता नमूद न केल्याने प्रकाशक शरद अहेर, रंजन ठाकरे यांच्याविरुद्ध तर नितीन भोसले यांच्या जाहिरात पत्रकावरही पत्ता नसल्याने प्रकाशक डॉ. प्रदीप पवार, अनंत सूर्यवंशी, अंकुश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.