रेस्क्यू सुरु : पांडवलेणीच्या डोंगरावर अडकले तीघे मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 01:45 PM2020-11-25T13:45:44+5:302020-11-25T13:49:19+5:30
तीघे हौशी मुले दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पांडवलेणीच्या डोंगरावरुन उतरत असताना अडकून पडली.
नाशिक : पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करण्यासाठी गेलेले तीघे मुले दुपारी ऊन्हाचा चटका वाढल्याने चक्कर येऊ लागल्यामुळे अडकून पडले आहेत. डोंगराच्या माथ्यावर ही मुले अडकून पडली असून त्यांना रेस्क्यू करण्यासाठी मनपा अग्निशमन दलाचे जवान व पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.
नाशिक शहरापासून जवळच असलेल्या पांडवलेणी डोंगरावर नेहमीच ट्रेकिंगसाठी तरुण मुले, मुली जात असतात. पांडवलेणीच्या डोंगरावर चढाई करण्यासाठी हौशी मंडळी डोंगराच्या पाठीमागील बाजूच्या रस्ता निवडतात. हा रस्ता वनविभागाच्या राखीव वनातून जातो. या रस्त्यावरुन विनापरवाना चढाई करणारे तीघे हौशी मुले दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पांडवलेणीच्या डोंगरावरुन उतरत असताना अडकून पडली. या डोंगराची चढाई फारशी सोपी वाटत असली तरी ती अत्यंत अवघड व धोकादायक आहे. प्रशिक्षित ट्रेकर्सदेखील ही बाब मान्य करतात. डोंगर उतरुन येताना डोळे गरगरुन चक्करदेखील येते आणि त्यामुळे पोटात भीतीचा गोळा उठतो. ही मुले डोंगरमाथ्यावर पोहचली; सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पोहचली; मात्र त्यांना उतरताना धाडस कमी पडू लागले आणि वाळलेल्या रानगवतावरुन पाय घसरु लागल्याने त्यांनी माथ्यावरच दगडांचा आधार घेत मोबाईलद्वारे पोलीस नियंत्रण कक्ष व मनपा अग्निशमन दलाकडे मदत मागितली. घटनेची माहिती मिळताच तत्काळ सिडको अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळ दाखल झाले.
तीनही मुले डोंगराच्या माथ्यावर अडकलेले असल्यामुळे जवानांनी त्यांना भोंग्यावरुन सुचना देत धीर दिला आणि दोरखंड व जाळी घेऊन जवानांनी आता डोंगरावर चढाई करण्यास सुरुवात केली आहे. पुढील तासाभरात तीनही मुलांना सुखरुप रेस्क्यू करुन डोंगराच्या पायथ्याशी आणण्यास जवानांना यश येईल, असा आशावाद अग्निशमन दलाच्या सुत्रांनी व्यक्त केला आहे.