केळवे बीच दुर्घटनेतील तिघांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 01:40 AM2022-03-05T01:40:50+5:302022-03-05T01:41:15+5:30
केळवे बीच येथे समुद्राच्या भरतीच्या पाण्यात स्थानिक एका मुलाला वाचविताना गुरूवारी (दि.३) जिल्ह्यातील तिघा युवकांचा बुडून मृत्यू झाला होता. शुक्रवारी (दि.४) खादगाव येथील दीपक वडक्ते याच्यासह नांदगाव मधील ओम विसपुते व कृष्णा शेलार या तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनमाड, नांदगाव : केळवे बीच येथे समुद्राच्या भरतीच्या पाण्यात स्थानिक एका मुलाला वाचविताना गुरूवारी (दि.३) जिल्ह्यातील तिघा युवकांचा बुडून मृत्यू झाला होता. शुक्रवारी (दि.४) खादगाव येथील दीपक वडक्ते याच्यासह नांदगाव मधील ओम विसपुते व कृष्णा शेलार या तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या चिंधु मोतीराम वडक्ते यांना तीन मुली आणि तीन मुले असून दीपक हा अतिशय लाडका आणि शाळेत हुशार देखील होता. नीट परीक्षेच्या तयारी करिता त्याने नाशिक येथील ॲकॅडमीत नुकताच प्रवेश घेतला होता. दीपक आणि त्याचे मित्र नाशिक येथे अशोक स्तंभ जवळ राहत होते. ॲकॅडमीच्या सहलीला गेल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत दीपक याचा मृत्यू झाला. सदर दुःखद घटना कुटुंबीयांना कळाल्यानंतर सर्वांनाच शोक अनावर झाला. गुरूवारी रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. नांदगाव येथेही ओम विसपुते व कृष्णा शेलार यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली होती. दीपक नामदेव विसपुते यांचा ओम हा एकुलता एक मुलगा होता. तर स्वत: च्या हिमतीवर व्यवसाय उभा करून कृष्णाच्या यशाची स्वप्ने बघणारे त्याचे वडील जगदीश शेलार यांची अवस्था खूप वाईट झाली होती. यावेळी हंबरडा फोडणाऱ्या कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.