तिघा दरोडेखोरांना सात दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:20 AM2019-03-30T01:20:42+5:302019-03-30T01:21:01+5:30
नाशिक शहरातून चारचाकी तसेच दुचाकी चोरी करीत आडगाव शिवारात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नानंतर पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील तिघा संशयित आरोपींची सात दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पंचवटी : नाशिक शहरातून चारचाकी तसेच दुचाकी चोरी करीत आडगाव शिवारात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नानंतर पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील तिघा संशयित आरोपींची सात दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये उडालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्यांना शुक्रवारी (दि.२९) न्यायालयात हजर केले असता तिघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आडगाव शिवारात गुरुवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी हरदीपसिंग टाक, राजेश टाक, अमनसिंग टाक, सुनीलसिंग जुनी व त्यांचा मित्र लखन या संशयितांनी सायखेडा परिसरात दरोडा टाकला होता. त्यानंतर त्यांनी आडगाव शिवारातील ज्वेलर्सचे कुलूप तोडून संदेश रक्ताटेला धारदार कोयता लावून मारण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर संशयितांनी चोरी केलेल्या एमएच १५ बीडी ९०६६ क्रमांकाच्या कारमधून पलायन करीत असताना दरोडेखोरांची कार उलटली. त्यामुळे बचावासाठी दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केल्याने या परिसरात काही वेळ चकमक उडाल्यानंतर पोलिसांनी राजेश टाकला ताब्यात घेतले होते. पंरतु पोलीस आणि दरोडेखोर यांच्यात उडालेल्या चकमकीदरम्यान हार्दिक टाक व सुनीलसिंग जुनी या दोघांनी पळ काढला. त्यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेत आडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
न्यायालयात हजर
या तिघांनाही शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान,या घटनेत पलायन करण्यात यशस्वी झालेल्या अमनसिंग व लखन या संशयितांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.