शहरासह जिल्ह्यातील विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:57 AM2018-09-01T00:57:23+5:302018-09-01T00:57:37+5:30
विषारी औषध सेवन करून रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ ३१) दुपारच्या सुमारास औरंगाबादरोडवरील संत जनार्दन स्वामी मठाच्या दगडी कमानीजवळ घडली़
नाशिक : विषारी औषध सेवन करून रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ ३१) दुपारच्या सुमारास औरंगाबादरोडवरील संत जनार्दन स्वामी मठाच्या दगडी कमानीजवळ घडली़ प्रशांत बाळासाहेब देशमुख (३५, रा. जानोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा जानोरी येथील रहिवासी व रिक्षाचालक प्रशांत देशमुख याने दुपारी तीन वाजेच्या सुमारास मठाच्या दगडी कमानीजवळ विषारी औषध सेवन केले़ त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ इमारतीचे सेट्रिंग काम करीत असताना पडल्याने जखमी झालेल्या युवकाचा गुरुवारी (दि़ ३०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष दगडू तावरे (रा. चेतनानगर, आव्हाडमळा, इंदिरानगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
दहा दिवसांपूर्वी काम करीत असता इमारतीवरून खाली पडल्याने त्याच्या कमरेस गंभीर दुखापत झाली होती. त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला़ या घटनेची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शेतामध्ये काम करीत असताना सर्पदंश झाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील बाºहे येथे गुरुवारी (दि़) सायंकाळी घडली़ गोविंद हरी खाडे (३०) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असताना त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यास सर्पदंश झाला़ त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.