जिल्ह्यातून तीन संचालक बिनविरोध
By admin | Published: March 2, 2016 11:21 PM2016-03-02T23:21:41+5:302016-03-02T23:22:12+5:30
निवड : कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना संचालक निवडणूक
सिन्नर : अहमदनगर व नाशिक जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यावर माजी आमदार अशोक काळे व युवा नेते आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाच्या १८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. या १८ संचालकांमध्ये नाशिक जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.
सिन्नर पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र भागवतराव घुमरे, सोमठाणे येथील डॉ. सर्जेराव दत्तात्रय कोकाटे व येवला तालुक्यातील मुखेड येथील विश्वासराव लक्ष्मण अहेर या नाशिक जिल्ह्यातील तिघांची या कारखान्यावर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. सिन्नरचे दोन, तर येवला तालुक्यातील एक संचालक या कारखान्यावर नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालक मंडळाच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मंगळवारी माघारीची अंतिम मुदत होती. माघारीच्या दिवशी १८ संचालक बिनविरोध निवडून आले. त्यात नाशिक जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.
पोहेगाव गटातून सिन्नर पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र भागवत घुमरे बिनविरोध निवडून आले. मंजूर गटातून सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील डॉ. सर्जेराव दत्तात्रय कोकाटे यांची बिनविरोध निवड झाली. घुमरे व कोकाटे या दोघांची सिन्नर तालुक्यातून संचालक म्हणून निवड झाली आहे, तर येवला तालुक्यातील मुखेड येथील विश्वासराव लक्ष्मण अहेर यांची धामोरी गटातून संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील सिन्नर व येवला तालुक्यातील सभासद
आहेत. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील १९ गावांचे कार्यक्षेत्र कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या क्षेत्रात येते.
दरम्यान, माजी आमदार अशोक काळे यांच्या नेतृत्वाखाली २१ पैकी १८ जागा बिनविरोध झाल्या असून, केवळ माहेगाव देशमुख गटात तीन जागांसाठी येत्या ९ तारखेला मतदान होत आहे. माहेगाव गटात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. काळे गटाकडून अशोक काळे, आशुतोष काळे व सूर्यभान कोळपे उमेदवार असून, त्यांच्याविरोधात अॅड. दिलीप लासुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मंजूर, पोहेगाव, चांदेकसारे, कोपरगाव, धामोरी या गटातील संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. केवळ माहेगाव गटासाठी निवडणूक होत आहे. (वार्ताहर)