शिंगवे तलावात बुडून मनमाडच्या तिघांचा मृत्यू
By Admin | Published: August 27, 2016 11:40 PM2016-08-27T23:40:10+5:302016-08-27T23:40:23+5:30
चांदवड तालुका : पोहणे बेतले जिवावर
मनमाड/चांदवड : तालुक्यातील मतोबाचे शिंगवे येथील झाल्टे वस्तीजवळ असलेल्या पाझर तलावात मनमाडचे तीन युवक बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी २ वाजेच्या सुमारास मनमाड येथील छत्रे हायस्कूलचे पाच विद्यार्थी मतोबाचे शिंगवे येथील झाल्टे वस्तीजवळील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते.
यावेळी तेजस महावीर ललवाणी (१६) रा. जैन स्थानक, मनमाड, केशव संभाजी गायकवाड (१६), रा. आंबेडकर चौक, मनमाड, अजीम अजीब पठाण (१६) रा. आंबेडकर चौक, मनमाड हे तिघे पाण्यात पोहण्यासाठी उतरले. त्यांनी सेल्फी फोटोही काढले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते मध्यभागी गेल्याने बुडाले. त्यांचे दोन मित्र शुभम मनोज कांबळे, रा. माधवनगर, मनमाड, स्वप्नील रवींद्र लोढा, रा. मुक्तांगण, मनमाड हे पाझर तलावाच्या काठावर उभे होते. तिघेही बुडाल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शोधण्यास अडचणी येत होत्या.
घटनेचे वृत्त समजताच मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, हवालदार सैंदाणे, मंगेश डोंगरे, कुशारे, चव्हाण, मोरे, कुमावत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने मनमाड, मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावले. या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तीनही तरुणांना बाहेर काढले. मात्र ते तिघेही मृत पावले होते. घटनेचे वृत्त समजताच मनमाड येथील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली . हे पाचही विद्यार्थी छत्रे हायस्कुलचे विद्यार्थी होते. तिघांचे मृतदेह मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले. मनमाड शहरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ( वार्ताहर)