गोदावरीत बुडून तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 01:15 AM2021-10-04T01:15:21+5:302021-10-04T01:19:17+5:30
येथील रामकुंडालगतच्या गांधी तलावामध्ये हातपाय धुण्याचा प्रयत्नात असताना पाय घसरून पडल्याने सिडको उत्तमनगर येथील ३६ वर्षीय रहिवाशासह जुने नाशिकमधील १२ वर्षीय अल्पवयीन आणि वडाळागावातील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी (दि.३) रामकुंडावरील आदिवासी जीवरक्षक दलाच्या पोहणाऱ्या युवकांनी तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.
नाशिक : येथील रामकुंडालगतच्या गांधी तलावामध्ये हातपाय धुण्याचा प्रयत्नात असताना पाय घसरून पडल्याने सिडको उत्तमनगर येथील ३६ वर्षीय रहिवाशासह जुने नाशिकमधील १२ वर्षीय अल्पवयीन आणि वडाळागावातील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी (दि.३) रामकुंडावरील आदिवासी जीवरक्षक दलाच्या पोहणाऱ्या युवकांनी तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. पंचवटी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उत्तमनगर येथील रहिवासी रावसाहेब हे त्यांच्या पत्नी, मुलीसोबत देवदर्शनासाठी आले होते. यावेळी गांधी तलावात ते हातपाय धुण्यासाठी उतरले असता त्यांचा पाय घसरून ते गोदापात्रात कोसळले. यावेळी आरडाओरड झाल्याने जीवरक्षकांनी गांधी तलावाच्या दिशेने धाव घेत गांधी तलावात सूर मारले. गोदावरीची पाणी पातळी जास्त असल्याने जीवरक्षकांनी पाण्यात खोलवर शोध घेतला असता महाजन यांचा मृतदेह, तसेच गांधी तलावाच्या दुसऱ्या बाजूने आणखी एक मृतदेह हाती लागला. दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले असता पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी गोदाकाठावर धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले.
रावसाहेब संतोष महाजन (३६, रा. गणेश कॉलनी, उत्तमनगर, सिडको), साहील सलीम अन्सारी (१२, रा.बुधवारपेठ, जुने नाशिक), ओवेस नदीम खान (२०, रा.गणेशनगर, वडाळागाव), अशी तिघा मृतांची नावे असल्याचे पंचवटी पोलिसांनी सांगितले. साहीलचा मृतदेह शुक्रवारी (दि.१) गाडगे महाराज धर्मशाळेसमोरील गोदापात्रात आढळून आला होता. साहील हा घरातून कोणाला काहीही न सांगता नदीवर आंघोळीसाठी गेला होता. ओवेसदेखील आंघोळीसाठी गोदावरीवर आला होता, असे पंचवटी पोलिसांनी सांगितले. रावसाहेब यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. तसेच साहील, ओवेसच्या पश्चातही आई, वडील आदी परिवार आहे. वडाळागाव, सिडको व जुने नाशिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.