पिस्तूल विक्री करताना तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 01:12 AM2018-10-19T01:12:28+5:302018-10-19T01:14:42+5:30
संगमनेर येथून गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपनगर बस थांब्यावर आलेल्या तिघा सराईत संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिकरोड : संगमनेर येथून गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उपनगर बस थांब्यावर आलेल्या तिघा सराईत संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे व इतर अधिकाऱ्यांनी आम्रपाली झोपडपट्टी परिसरात बुधवारी (दि.१७) सायंकाळी पाच वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत कोम्बिंग आॅपरेशन मोहीम पूर्ण केली. त्यानंतर कोकाटे हे आपल्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले असता उपनगर नाका सिग्नलजवळ उभ्या असलेल्या बलिनो मोटार (एमएच १५, जीएल ४३७९) व काळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर (एमएच १२ एचएफ ४२९७) या वाहनांवर त्यांचा संशय बळावला. कोकाटे यांच्यासोबत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफ पठाण, ज्ञानेश्वर कसबे यांनी त्वरित तेथे थांबून उभ्या असलेल्या चौघा युवकांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना सदर घटनेची माहिती मिळाल्याने तेदेखील पोलीस कर्मचाºयांसह दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मोटारींची झडती घेण्यास सुरुवात केली असता चौघांपैकी तिघे पोलिसांच्या हाती लागले मात्र त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. कोकाटे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी असूनही एका संशयिताने हातावर तुरी देऊन पोबारा केला. संगमनेरमधून आलेला अमजद दाऊद सय्यद याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे व ५६ हजार ४५० रुपयांची रोकड हस्तगत केली. अमजद व त्याचा साथीदार पिस्तूल व काडतुसे काठेगल्ली येथील सुदर्शन प्रदीप शिंदे व वडाळागावातील सदाशिव पाराजी गायकवाड यांना विक्री करण्यासाठी आले होते.
एक सराईत गळाला; दुसºयाचा गुंगारा
संशयित इमरान पठाण (रा. मोगलपुरा) हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला. सुदर्शन, सदाशिव यांच्यासह अमजदला पोलिसांनी अटक केली आहे. सदाशिव हा वडाळागावातील घरकुलच्या इमारतीत वास्तव्यास असून तो यापूर्वी फुले झोपडपट्टीत राहात होता.
पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर इंदिरानगर, भद्रकालीसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. घरफोड्या, हाणामाºया, जबरी लूट यांसारख्या गुन्ह्यांची उकल त्याच्याकडून होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.