विकास आराखड्यात तीन हॉकर्स झोन

By admin | Published: November 22, 2015 12:07 AM2015-11-22T00:07:32+5:302015-11-22T00:07:57+5:30

खासगी जागांवर आरक्षण : ताबा घेण्याबाबत पालिकेचा विचार

Three Hawker zones in development plan | विकास आराखड्यात तीन हॉकर्स झोन

विकास आराखड्यात तीन हॉकर्स झोन

Next

नाशिक : राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या फेरीवाला क्षेत्राच्या आराखड्याची अंमलबजावणी जानेवारी २०१६ पासून होण्याची शक्यता असतानाच सुधारित विकास आराखड्यातही तीन ठिकाणी हॉकर्स झोनसाठी आरक्षण टाकण्यात आल्याने संबंधित जागांचाही पालिकेने विचार सुरू केला आहे. दरम्यान, महापालिकेने शहरातील सुमारे १९० ठिकाणे फेरीवाला क्षेत्र म्हणून निश्चित केली आहेत.
राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने सहाही विभागात फेरीवाला क्षेत्राची अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. शहर फेरीवाला समिती, पोलीस आयुक्तालय यांच्या संमतीनंतर महापालिकेने सहाही विभाग मिळून सुमारे १९० हून अधिक ठिकाणी फेरीवाला क्षेत्र निश्चित केले असून, ८९ ठिकाणे ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून निश्चित केली आहेत. या फेरीवाला क्षेत्रासाठी महापालिकेकडे दहा हजारांहून अधिक फेरीवाल्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यांना प्रत्यक्ष जागांचे वाटप आयुक्तांच्या अंतिम मान्यतेनंतर जानेवारी २०१६ मध्ये होण्याची शक्यता आहे. महापालिकेने फेरीवाला क्षेत्राचा आराखडा निश्चित केलेला असतानाच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सुधारित शहर विकास आराखड्यातही तीन ठिकाणी हॉकर्स झोनसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने, नाशिक झोनमध्ये सर्व्हे नंबर २४१ (पै) वर ३१८० स्क्वेअर मीटर खासगी जागेत, तसेच नाशिक झोनमध्येच सर्व्हे नंबर ५२८ (पै) वर २९८० स्क्वेअर मीटर खासगी जागेत आरक्षणाचा समावेश आहे. तर देवळाली विभागात सर्व्हे नंबर २४२ (पै) वर २८७५ स्क्वेअर मीटर जागेत हॉकर्स झोन तथा खोक मार्केटसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे. सदर आरक्षणाची जागा संपादित करण्याची जबाबदारी महापालिकेची राहणार असून त्यासाठी महापालिकेला सुमारे २० कोटी रुपये मूल्य मोजावे लागण्याची शक्यता आहे. सुधारित विकास आराखड्यात टाकण्यात आलेल्या हॉकर्स झोनसाठीच्या आरक्षणांसंबंधी नगररचना विभागाकडून अधिक माहिती मागविण्यात आली असून, सदर जागा महापालिकेच्या मालकीच्या नसल्याने त्यांचा ताबा घेण्याबाबत पालिकेने विचार सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three Hawker zones in development plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.