तीन तासांच्या चर्चेचा ‘कचरा’

By admin | Published: December 19, 2014 12:32 AM2014-12-19T00:32:52+5:302014-12-19T00:34:54+5:30

त्र्यंबकच्या कचऱ्याचा प्रस्ताव : सदस्यांचा प्रचंड विरोध, महापौरांकडून मात्र आयुक्तांना अधिकार

Three-hour talk 'trash' | तीन तासांच्या चर्चेचा ‘कचरा’

तीन तासांच्या चर्चेचा ‘कचरा’

Next

नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीतील घनकचरा नाशिक महापालिकेच्या खतप्रकल्पावर स्वीकारण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत सदस्यांनी प्रचंड विरोध दर्शविला. खतप्रकल्पाचा झालेला कचराडेपो आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सार्वजनिक आरोग्याच्या समस्या यावरही सदस्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. दरम्यान, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सरकारचा निर्णय कसे मान्य करणे बंधनकारक आहे, हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तास चाललेल्या या चर्चेत एकूणच सभागृहाचा नूर विरोधाचा असताना महापौरांनी याप्रश्नी प्रशासनाला सर्वाधिकार देत कचऱ्याचा प्रस्ताव आयुक्तांच्या टोपलीत टाकून दिला.
महापालिकेच्या महासभेत त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीतील घनकचरा नाशिक महापालिकेच्या खतप्रकल्पावर स्वीकारण्याचा प्रस्ताव चर्चेला आला असता सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला. शिवाजी चुंभळे, सुदाम कोंबडे, अरविंद शेळके या स्थानिक नगरसेवकांनी खतप्रकल्पाची दुरवस्था कथन करत अगोदरच कचऱ्याचे ढीग साचले असताना आणखी त्र्यंबकच्या कचऱ्याचा वानोळा कशाला, असा सवाल केला. सभागृहात तीन वेळेस हा प्रस्ताव आणण्यात आला आणि त्यास सातत्याने विरोध होत असतानादेखील कचरा स्वीकारण्याचा आग्रह कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करत या सदस्यांनी खतप्रकल्पाची पाहणी करण्याची विनंती आयुक्तांना केली. संभाजी मोरुस्कर यांनी निर्माल्य न स्वीकारण्याबाबतचा अगोदरचा ठराव शासनाकडे विखंडित करण्यासाठी प्रशासनाकडे पाठविल्याबद्दल जाब विचारला.
शोभा आवारे यांनी ‘घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे’ अशा शब्दात त्र्यंबकच्या कचऱ्याला विरोध दर्शविला. संजय चव्हाण यांनी तर कचरा स्वीकारण्याबाबत शासन जर आग्रह धरत असेल तर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. उद्धव निमसे यांनीही हरित लवादाने दिलेल्या आदेशाची तप्तरता कचऱ्याबाबत दाखविली तशी गोदावरी प्रदूषणाच्या निर्णयाबाबत का दाखविली नाही, असा सवाल उपस्थित केला. अजय बोरस्ते यांनी अगोदर आपला खतप्रकल्पच धडपणे चालविला जाऊ शकत नाही, तेथे बाहेरचा कचरा कसा आणला जातोय, असा जाब विचारला.
शाहू खैरे यांनी सरकारी आदेशाची व कायद्याची भोकाडी दाखवून हा प्रस्ताव मंजूर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला. कविता कर्डक, तानाजी जायभावे, रमेश धोंगडे यांनीही खतप्रकल्पातील वास्तव मांडले.

Web Title: Three-hour talk 'trash'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.