नाशकात होणार तीनशे किलोमीटरचे रस्ते, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर हजार कोटींची गरज
By Suyog.joshi | Published: September 23, 2023 04:20 PM2023-09-23T16:20:26+5:302023-09-23T16:20:41+5:30
सिंहस्थासाठी प्रत्येक विभागाने प्राथमिक आराखडे तयार केले असून, विकासकामांचा हा आकडा एकूण आकडा आठ ते दहा हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे.
नाशिक : दर बारा वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा नाशिक शहराच्या विकासासाठी पर्वणी ठरतो. सन २०२७-२०२८ मध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महपालिकेच्या बांधकाम विभागाने जोरदार तयारी सुरू केली असून, शहरात तीनशे किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जुने रिंगरोडची रुंदी वाढविणे, अस्तरीकरण व शक्य तेथे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
सिंहस्थासाठी प्रत्येक विभागाने प्राथमिक आराखडे तयार केले असून, विकासकामांचा हा आकडा एकूण आकडा आठ ते दहा हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे. त्यात एकट्या बांधकाम विभागाचा खर्च तीन ते चार हजार कोटींच्या घरात आहे. त्यात प्रामुख्याने इनर व मीडल रिंगरोडसह मिसिंग लिंकवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गत सिंहस्थात शहरात ७२ किलोमीटरचे रस्ते उभारण्यात आले होते. यंदा ते धरून एकूण तीनशे किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारण्याचे नियोजन आहे. त्यात १९० किलोमीटरचे इनर रिंगरोडचा समावेश आहे.
मागील सिंहस्थात पंधरा मीटरचे रिंगरोड उभारण्यात आले होते. त्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काहींची मागील बारा वर्षांपासून डागडुजीही झाली नाही. अशा १५ मीटरच्या रस्त्यांचे रुंदीकरण करून ते तीस मीटरचे केले जातील. त्यासाठी भूसंपादनाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असून, त्यावर तोडगा काढताना बांधकाम विभागाची कसोटी लागणार आहे. नवीन रिंगरोडसाठीही भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी किती क्षेत्र बाधित होईल, किती मोबदला द्यावा लागू शकतो यावर प्राथमिक स्तरावर काम सुरू आहे. तसेच इनर व मीडल रिंगरोडमधील मिसिंग दूर केल्या जातील. सिंहस्थात लाखो भाविक शहरात येणार असून, वाहतूक कोंडी मोठी समस्या ठरू शकते. त्यामुळे बांधकाम विभागाने शहरात रस्त्याचे जाळे विणण्यास प्राधान्य देणार असून, जेणेकरून कुंभमेळा कालावधीत एका ठिकाणाहून दुसरीकडे ये-जा करण्यासाठी मुख्य शहरातून जाणे टाळत इनर रिंगरोडचा वापर करून कोंडी टाळणे शक्य होईल.
मागील सिंहस्थात ७२ किलोमीटरचे इनर रिंगरोड तयार करण्यात आले होते. यंदाच्या सिंहस्थात तीनशे किमीचे जाळे विस्तारले जाईल. तसेच जुन्या रिंगरोडचे रुंदीकरण केले जाईल. त्यासाठी किती भूसंपादन गरजेचे आहे, त्यावर काम सुरू आहे.
- शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, मनपा