नाशिकच्या बांधकाम खात्यातूनच सव्वा तीनशे मोजमाप पुस्तिका गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:51 PM2017-12-13T14:51:58+5:302017-12-13T14:59:12+5:30
नाशिक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर विभागाच्या अंतर्गंत येणा-या पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण व त्र्यंबकेश्वर तालुक्यात काही वर्षापुर्वी करण्यात आलेल्या विविध कामांच्या काम पुर्ण झाल्याच्या नोंदी ठेवणा-या मोजमाप पुस्तिका या कामांवर नियंत्रण व देखरेख ठेवणा-या संबंधित अधिका-यांकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सादर करण्यात आलेल्या नाहीत.
नाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याने आदिवासी तालुक्यांमध्ये ठेकेदारांकरवी पुर्ण केलेल्या कामांच्या मोजमाप पुस्तिका (एम.बी.) अनेक वर्षापासून सापडत नसल्याने जवळपास सव्वा तीनशे कामांचे देयके रखडले असून, या पुस्तिकांचा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून शोध घेतला जाऊन त्यासाठी संबंधित कामांवर नियंत्रण ठेवणा-या अधिका-यांवर जबाबदारी निश्चित केली जात असली तरी, काम पुर्ण झाल्यानंतर देयक काढण्यासाठी बांधकाम खात्याकडून जी पद्धत अवलंबीली जाते ते पाहता, सात ते आठ टेबलवरून मोजमाप पुस्तिका फिरत असल्याने सदरच्या पुस्तिका बांधकाम खात्यातच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उत्तर विभागाच्या अंतर्गंत येणा-या पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण व त्र्यंबकेश्वर तालुक्यात काही वर्षापुर्वी करण्यात आलेल्या विविध कामांच्या काम पुर्ण झाल्याच्या नोंदी ठेवणा-या मोजमाप पुस्तिका या कामांवर नियंत्रण व देखरेख ठेवणा-या संबंधित अधिका-यांकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सादर करण्यात आलेल्या नाहीत. त्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता, उप अभियंत्यांना पत्रे पाठवून वारंवार कामांच्या मोजमाप पुस्तिकांची मागणी केली आहे. परंतु त्याला अधिकारी दाद देत नसल्याचे पाहून वृत्तपत्रातून जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून कार्यकारी अभियंत्यांनी सुमारे ७२ अभियंत्यांच्या नावे व त्यांच्याकडे प्रलंबीत असलेल्या मोजमाप पुस्तिकांचे क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. दहा दिवसात सदरच्या पुस्तिका जमा न केल्यास संबंधित कामांचे देयके अदा न करण्याची तसेच त्या पुस्तिका गायब झाल्याची पोलीसात तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडला असल्याचे जाणकारांचे म्हणणे असून, मुळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे कामे टक्केवारीने चालतात हे आजवर लपून राहिलेले नाही, त्यामुळे काम झटपट पुर्ण करण्याकडे जसा ठेकेदाराचा कल असतो, तसाच त्या कामाचे नियंत्रण करणा-या अधिका-यालाही काम हातावेगळे करण्याची घाई झालेली असते. मुळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे काम करणारे ठेकेदारच अधिका-यांऐवजी मोजमाप पुस्तिका हाताळत असतात व तेच या पुस्तिकेच्या आधारे कामाचे देयक तयार करीत असतात, अधिका-याची स्वाक्षरी घेतल्यानंतर देयकासाठी मोजमाप पुस्तिका सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्यालयात सादर केली जाते. काम केलेले असल्यामुळे ठेकेदाराला बिलासाठी घाई असल्याने तो कोणत्याही परिस्थितीत मोजमाप पुस्तिका स्वत: जवळ ठेऊ शकत नाही, तर अधिका-यांचाही त्यात ‘रस’ असल्याने त्यांच्याकडूनही विलंब होण्याची शक्यता नसते.