दुकान फोडून तीन लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 01:35 AM2019-03-09T01:35:43+5:302019-03-09T01:37:04+5:30
जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील श्रीहरी कुटे मार्गाच्या परिसरातील फरशीच्या दुकानाला मागील दरवाजाला असलेले कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातून साडेतीन लाख रुपयांची रक्कम चोरल्याची घटना घडली आहे.
नाशिक : जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील श्रीहरी कुटे मार्गाच्या परिसरातील फरशीच्या दुकानाला मागील दरवाजाला असलेले कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातून साडेतीन लाख रुपयांची रक्कम चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी बुधवारी (दि.६) जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील श्रीहरी कुटे मार्ग परिसरातील फरशीचे दुकान फोडले. दुकानाच्या मागील बाजूला असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करीत गल्ल्यातून साडेतीन लाख रुपयांची रक्कम चोरली आहे. गोविंदनगर भागातील रहिवासी पीयूष राजेंद्र डुंगरवाल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीहरी कुटे मार्गावरील बिझनेस बिल्डिंगच्या शॉप नंबर १८ मध्ये ही चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या मागील दरवाजास लावलेले कुलूप बनावट चावीच्या सहाय्याने उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातून ३ लाख ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोेडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेच्या गळ्यातील पोत लांबविली
नाशिकरोड : डावखरवाडी येथे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी ओढून चोरून नेली.
जयभवानीरोड पुष्परंग हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या वंदना सदानंद बामणे (५९) या बुधवारी सायंकाळी रिक्षाने श्री घंटी म्हसोबा मंदिर येथे उतरून दूध घेऊन रस्त्याने पायी घरी जात होत्या. यावेळी समोरून दुचाकीवर आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी बामणे यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची ४२ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओढून चोरून नेली. सोन्याची पोत ओढल्यानंतर दोघे दुचाकीवरून चोरटे सुसाट वेगाने पळून गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.